इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधू पराभूत

0

बर्मिंगहॅम। ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित ताइ त्झू यिंगने भारताच्या पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. यांच्या मधील सामना अवघा 34 मिनिटांचा झाला असून या सामन्यात अग्रमानांकित ताइ त्झू यिंगने सिंधूवर 21-14, 21-10 अशी मात केली.सिंधू कडून मोठ्या अपेक्षा होत्या. उपांत्यपूर्व फेरीत तिला ताइ त्झू यिंगचे आव्हान परतवून लावण्यात यश आले नाही. जागतिक क्रमवारीत ताइ त्झू यिंग पहिल्या, तर सिंधू सहाव्या स्थानी आहे. यापूर्वी या दोघी आठ वेळा आमनेसामने आल्या होत्या. यात यिंगने पाच वेळा, तर सिंधूने तीन वेळा बाजी मारली होती. रिओ ऑलिंपिकमध्ये सिंधूने ताइ त्झू यिंगला पराभव ूकेला होता.

ब्रेकनंतर यिंगने मागे वळून पाहिलेच नाही
पहिल्या गेममध्ये सिंधूने आक्रमक सुरुवात केली. तिने 1-3 अशा पिछाडीनंतर सलग चार गुण घेतले. त्यामुळे सिंधूकडे एक वेळ 9-5 अशी आघाडी होती. पण सलग चार गुण घेत यिंगने ब्रेकला 11-10 अशी एका गुणाची आघाडी मिळवली. यिंगने 12-12 अशा बरोबरीनंतर सलग पाच गुण घेतले. यानंतर तिला गाठणे सिंधूला शक्य झाले नाही आणि ही गेम यिंगने 21-14 अशी जिंकली. दुसर्‍या गेममध्ये यिंगने सिंधूला संधीच दिली नाही. तिने 8-3 अशी वाढवली. ब्रेकपर्यंत यिंगने 11-5 अशी आघाडी मिळवली होती. ब्रेकनंतर यिंगने मागे वळून पाहिलेच नाही. तिने 16-10 अशा आघाडीनंतर सलग पाच गुण घेत गेमसह लढत जिंकली.

यिंगने उपांत्य फेरीत प्रवेश
गेल्या वर्षी पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता, तर ताइ त्झू यिंगने सलग तिसर्‍या वर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत तिची लढत साईना नेहवाल आणि सुंग जि ह्यून यांच्यातील विजेतीशी होईल.दुसरीकडे दुसर्‍या फेरीत दुसरी मानांकित कॅरोलिन मरिनला पराभव टाळण्यात यश आले. चीनच्या हे बिंगजिआओचे आव्हान परतवून लावण्यासाठी तिला एक तास संघर्ष करावा लागला. अखेर कॅरोलिनने बिंगजिआओला 15-21, 21-19, 21-10 असे नमविले. पराभवाच्या उंबरठ्यावरून कॅरोलिनने विजय खेचून आणला.