इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार कुकचा कर्णधार पदाचा राजीनामा ‘

0

लंडन: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार अॅलिस्टर कुकने कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. कसोटी, एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारात झालेल्या दारुण पराभवामुळे पूर्णपणे निराशाजनक ठरलेल्या भारत दौऱ्यानंतर इंग्लंड क्रिकेटला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कुकच्या पश्चात इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रुटकडे संघाचे नेतृत्त्व जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

59 कसोटी सामन्यात नेतृत्व
कूकने 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते. डावखुरा फलंदाज म्हणून संघासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या कूकची कप्तानी कारकीर्द चढ-उतारपूर्ण राहिली. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. तसेच दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका आदी संघांनाही कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने पराभूत केले होते. पण 2013मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅसेस मालिका, तसेच गतवर्षी पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या मालिकांमध्ये इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला होता.

संधी मिळाली हे माझे भाग्य: कुक
गेल्या पाच वर्षांत मला संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो, हा माझ्यासाठी सर्वात चांगला काळ होता, असे कुक म्हणाला. कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, पण मी घेतलेला निर्णय अचूक आणि योग्य वेळी घेतला आहे, असेही तो पुढे म्हणाला. नुकतेच झालेल्या भारत दौऱयात संघाचा कर्णधार म्हणून माझी कामगिरी निराशाजनक झाली होती आणि याबाबत मी गेल्याच आठवड्यात संघ व्यवस्थापनाशी बोललो. माझा कर्णधारपदाचा राजीनामा त्यांनी स्विकारावा, असेही त्यांना सांगितल्याचे कुक म्हणाला.