आसन करणे योगा नसून ती एक जीवन शैली आहे

0

जळगाव । योगा म्हणजे केवळ विविध शारीरीक स्थितीत केले जाणारे आसने नव्हे तर योगा ही एक जीवन शैली आहे असे योग प्रशिक्षक व आहारतज्ज्ञ दिपाली लोढा यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ‘योगा ए हिलींग थेरपी ऍन्ड प्रॉपर डाएट फॉर युवर हेल्थ’ या विषयांवर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष योगेश भोळे व मानद सचिव संजय इंगळे यांची उपस्थिती होती.लोढा यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक दुखणं हा आजार नसतो. योगामुळे तुमची शारीरिक स्थिती सामान्य राहते. योगाच्या सरावात मात्र सातत्य असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही वयात करता येतो योगा
प्राणायम श्वासाचा व्यायाम असून योग्य मार्गदर्शनात तो शिकला पाहिजे असे सांगितले. भारतीय पध्दतीचे जेवण आहाराच्या दृष्टीने योग्य व समतोल आहे. आपल्या भागात ज्या ऋतुत जी फळे, पालेभाज्या उपलब्ध होतात ती खाल्लीच पाहिजे. दिवसाच्या 14 तासात 14 ग्लास पाणी पिणे चांगले आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वयात योगा व प्राणायम करता येतो. त्यामुळे नकारात्मता जाऊन तुमची आत्मशक्ती जागृत होते. तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत पोहचू शकता व समाधानी जीवन जगू शकतात असे शेवटी लोढा यांनी म्हटले. परिचय स्वाती सारडा यांनी तर आभार विनीत जोशी यांनी मानले.