आशावर्करचा विनयभंग करणार्‍या आरोग्य सेवकाला शिरपूर पोलिसांनी केली अटक

Shirpur Police Arrested The Health Worker Who Molested Aasha Worker शिरपूर : तालुक्यातील वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने आशा वर्करचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सायंकाळी उशिरा शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोग्य सेवकाविरोधा अ‍ॅट्रासिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी तथा आरोग्यसेवक महेश देवराम ईशी (शिरपूर) यास तालुका पोलिसांनी अटक केली. संशयीतास गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सर्वेबद्दल बोलताना केला विनयभंग
शिरपूर तालुक्यातील वकवाड आरोग्य उपकेंद्राअंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशावर्कर यांच्या मार्फत गावात कुष्ठरोग, क्षयरोग, गरोदर माता सेवा व ईतर आरोग्य संदर्भात सर्व्हे करण्यात येत आहे. बुधवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आलेल्या सर्व्हेत पीडीत आशा वर्कर महिलेने चुकीचा सर्व्हे केल्याचे फोनवरून सांगून नव्याने सर्व्हे करण्यासाठी 12 वाजेच्या सुमारास आरोग्य सेवक महेश ईशी याने आरोग्य उपकेंद्रात बोलावले. उपकेंद्रातील क्लिनीक रुममध्ये चुकीचा सर्व्हे केल्याबद्दल समजावत असतांना आरोग्य सेवक महेश ईशी याने स्त्री मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याचा आरोप करीत पीडीत आशावर्कर महिलेने शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताच गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर करीत आहे.