आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत कुर्‍हाडे

0

आळंदी । आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुर्‍हाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (कांबळे) यांनी शुक्रवारी जाहीर केले. यावेळी स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे दिनेश घुले आणि शिवसेनेच्या सविता गावडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. आळंदी नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्षा उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली. या सभेत सर्व नवनिर्वाचित सदस्यांंसह मुख्याधिकारी संतोष टेंगले उपस्थित होते.

पक्ष वरिष्ठांच्या शिफारसीनुसार निवडी

उपनगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील शिवसेनेच्या शैला तापकीर आणि भाजपचे सचिन गिलबिले यांनी आपले अर्ज माघारी घेतले. यामुळे कुर्‍हाडे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तत्पूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष दालनात आले. त्यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी दिनेश घुले यांच्या नावाची शिफारस केली. शिवसेना आणि भाजपच्या नगरपरिषदेतील बळाचा विचार करून प्रत्येकी एक-एक नगरसेवक स्वीकृतसाठी निवडला जाणार याचा विचार करून शिवसेनेचे गटनेते आदित्य घुंडरे यांनी पुणे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांच्या पत्नी सविता गावडे यांच्या नावाची शिफारस केली. यामुळे घुले आणि गावडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

उमेदवारांची मोर्चेबांधणी

स्वीकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आळंदीतही पक्षीय अंकुश राहणार असल्याने पदासाठी एका गटातून दुसर्‍या गटात जाण्याचे मार्ग बंद झाल्याचे दिसून आले. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांंचा सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी तसेच भंडार्‍याची मुक्त उधळण करीत माऊली मंदिरात त्यांनी श्रींचे दर्शन घेतले.

तीर्थक्षेत्र विकास कामातील त्रुटी दूर करून विकासकामे मार्गी लावली जातील. यात भाविक आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या विकासकामास प्राधान्य राहील. रस्ते, प्रशासकीय इमारत, शाळा, पर्यटक निवास, नदी प्रदूषण कमी करण्याच्या कामास प्राधान्य देऊ. विकास आराखड्यातील कामासाठी जिल्हाधिकार्‍यांसमवेत आळंदीत 27 फेब्रुवारीला विकास कामाची पाहणी करून विशेष बैठक घेण्यात येणार आहे.
– बाळा भेगडे, आमदार