आळंदीला संतभूमी घोषित करा!

0

आळंदी : येथील तीर्थक्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मद्य, मांस व अन्य अनैतिक प्रकाराला प्रतिबंध घालावा आणि आळंदीला संतभूमी घोषित करावी, अशी मागणी येथील वारकरी मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राजू महाराज ढोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, बाळा भेगडे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज शिंदे पाटील, विश्‍वस्त रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक, दिनकर शास्त्री भुकेले आदी उपस्थित होते.

अनैतिक प्रकारांमुळे सतकर्म लोप
आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे 35 वारकर्‍यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आळंदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. अस्वच्छता व अनैतिक प्रकार वाढल्यामुळे सतकर्म लोप पावत चालले आहे. याची दखल घेऊन संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवित्र स्थळाचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने आळंदीला संतभूमी घोषित करावी. येथील मद्य, मांस व अनैतिक प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी वारकर्‍यांनी केली आहे.