आर. के वाइन्स प्रकरणी एमआयडीसी पोलीस निरीक्षकांसह चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव– आर के वाइस प्रकरणात सहभागाचे निष्पन्न झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह कर्मचारी मनोज सुरवाडे, जीवन पाटील व संजय जाधव या चौघांविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याला अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण

लॉकडाऊनमधील अवैध दारुची विक्री करणारे आर.के.वाईन्सवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला. या मद्यप्रकरणी काही पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याने तसेच त्याचे धागेदोर पाहता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रकरणाच्या मूळाशी जावून नेमकी सत्यता जाणून घेण्यासाठी चौकशीसाठी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची नियुक्त केले. एसआयटीकडून याचा सखोलपणे तपास व चौकशी सुरू होती. त्यात आर.के.वाईन्स अवैध मद्य प्रकरणाशी संबंध जोडलेले मनोज सुरवाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव, तालुका पोलीस स्टेशनचे भारत पाटील यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. तसेच पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह कर्मचार्‍याचीही भागीदारी असल्याचे समोर आले होते. त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्यात आले असुन तपास अंतिम टप्प्यात आहे.

पोलीस निरीक्षकांसह चौघे कर्मचारी आरोपी

एसआयटीच्या तपासानुसार एमआयडीसी पोलीस निरीक्षकासह मनोज सुरवाडे, संजय जाधव, जीवन पाटील आणि भारत पाटील या चौघ कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आर के वाइस प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस निरीक्षकासह चारही कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये ही कार्यवाही करण्यात आली. तसेच या प्रकरणात कलमही वाढवण्यात आली आहे. सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात एक दोन दिवसात या संबंधित पोलीस निरिक्षकांसह कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Copy