आर.आर. विद्यालय विजयी तर ला.ना. विद्यालय उपविजयी

0

भुसावळ: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने साकेगाव येथे आयोजित 17 वर्षाआतील शालेय मनपास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आर.आर. विद्यालयाने ला.ना. शाळेला नमविले तर तृतीय स्थानी अँग्लो उर्दू हायस्कुलला समाधान मानावे लागले. विजयी, उपविजयी संघास तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन खामगड, महावितरणचे दिलीप कोल्हे, सरपंच आनंद ठाकरे, तलाठी हेमंत महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

जिल्हाभरातील खेळाडूंचा सहभाग
याप्रसंगी तलाठी हेमंत महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट सचिव वासेफ पटेल, सेवानिवृत्त तिकीट निरीक्षक अधिकारी निवृत्ती पवार, अबरार पटेल, रमजान पटेल यांची उपस्थिती होती. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

विभागीय स्पर्धेत स्थान निश्‍चित
अंतीम सामन्यात जळगाव येथील आर.आर. विद्यालयाने ला.ना. विद्यालयाला 53 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात ला.ना. विद्यालय केवळ 38 धावाच करु शकले. आर.आर. विद्यालयाने 14 धावांनी सामना जिंकला व विभागासाठी आपले स्थान निश्‍चित केले.

यांचे लाभले सहकार्य
तृतीय स्थानी अँग्लो उर्दू जळगावला समाधान मानावे लागले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राहुल कोळी, प्रतिक कुळकर्णी, राहुल महाजन, क्रीडाशिक्षक मधुकर वाणी, गोपाल जोनवाल, राजू कुळकर्णी, शेख हुसनोद्दीन, वसीम मिर्झा, के.टी. पाटील, दिपक आर्डे, विशाल देसले, अजय डोळे, विकास पाटील, सौरभ चौधरी, अजय चौधरी, इंदल परदेशी आदींचे सहकार्य लाभले.