आरोग्य सर्वेक्षणात आढळले विविध व्याधींचे सात हजार रुग्ण

रावेर तालुक्यात तीन हजार 327 रुग्णांना उच्च रक्तदाब तर दोन हजार 842 जणांना मधूमेह -दीपाली कोतवाल

रावेर (शालिक महाजन) : शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत रावेर तालुक्यात आरोग्य विभागातर्फे प्रत्येक घराचे व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 521 जणांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात 70 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आढळल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तर सर्वेक्षणात विविध प्रकारच्या व्याधी असलेले सात हजार 376 रुग्ण आढळून आले. त्यात तीन हजार 327 रुग्ण उच्च रक्तदाबाचे तर दोन हजार 842 जणांना मधूमेह असल्याचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल म्हणाल्या.

367 टीमद्वारे 121 गावात सर्वेक्षण
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. तालुक्यातील ऐनपूर, चिनावल खिरोदा, लोहारा, निंभोरा, थोरगव्हाण, वाघोड या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे 121 गावात ही मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी 367 टीम तयार करण्यात आल्या व याकामी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर व अंगणवाडी कर्मचार्‍यांची मदत घेण्यात आली होती.

पावणे तीन लाख नागरीकांची तपासणी
या अभियानांतर्गत तालुक्यातील दोन लाख 77 हजार 233 नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नऊ हजार 626 घरांना, चिनावल केंद्रांतर्गत नऊ हजार 115, खिरोदा पाच हजार 474, लोहारा पाच हजार 437, निंभोरा आठ हजार 030, थोरगव्हाण पाच हजार 375, वाघोड नऊ हजार 960, सावदा तीन हजार 986, रावेर तीन 251 अशा एकूण 62 हजार 254 घरांना सर्वेक्षण करणार्‍या पथकाने भेटी दिल्या. त्यातील दोन लाख 77 हजार 233 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लक्षणे असणारे 521 रुग्ण
सर्वेक्षणात कोरोना लक्षणे असलेले एकूण 521 रुग्ण आढळले आहेत. त्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असलेले 109 जण, 95 च्या खाली ऑक्सिजन लेव्हल असलेले 27 जण, 100 पेक्षा अधिक प्लस रेट असलेले 29 जण, वास न येणारे 32, चव नसलेले 50, ऐकू न येणारे 14, सर्दी-खोकला ताप असलेले 215 व सारीचे पाच असे एकूण 521 रुग्ण समोर आले. या सर्वांची कोरोना अँटीजन टेस्ट केली असता त्यात 70 जण पॉझीटीव्ह आढळले.

सात हजार 376 नागरीक व्याधीग्रस्त
तालुक्यातील विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण उच्च रक्तदाब असलेले आहेत. तीन हजार 327 नारीकांना रक्तदाब आजार असून दोन हजार 842 रुग्ण मधुमेहाचे, 310 रुग्ण हृदयविकार असलेले, 280 रुग्ण अस्थमाचे, 74 रुग्ण किडणीच्या आजाराचे, 87 कॅन्सरग्रस्त, 66 क्षयरोगाचे, 22 कुष्ठरोग असलेले व 368 रुग्ण लठ्ठपणा असलेले आढळून आले आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत तालुक्यातील पावणेतीन लाख नागरीकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात कोरोना लक्षणे आढळून आलेल्या नागरीकांची तत्काळ अँटीजन टेस्ट करण्यात येऊन त्यांचे विलागीकरण करण्यात आल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता आला तर व्याधीग्रस्त नागरीकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या असल्याचे रावेरचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल म्हणाल्या.