आरबीआयचे निर्णय बदल हा धोरणाचा भाग

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना गेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेने सतत नियम बदलले. हा रणनीतीची भाग होता, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेचे समर्थन केले. नोटाबंदीचा निर्णय इतका मोठा आहे, की आपले भलेभले अर्थतज्ज्ञही गोंधळात पडले, असा टोलाही त्यांनी लगावला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथमच पंतप्रधानांनी एका माध्यमास मुलाखत दिली. त्यात त्यांनी या निर्णयामागछी सरकारीच भूमिका विषद केली. ‘काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी आम्ही नोटाबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय भविष्यासाठी घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचार्‍यांच्या कोंडीसाठीच बदल
गेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेने वारंवार नियम बदलले. त्यावर टीकाही झाली. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या या भूमिकेचे पंतप्रधानांनी जोरदार समर्थन केले. तुमची नीती आणि रणनीती वेगळी असायला हवी. या दोन्ही गोष्टी एकाच दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. नोटाबंदीचा निर्णय आमची नीती दाखवणारा आहे. आमची रणनीती वेगळी असणे आवश्यक होते. शत्रूच्या एक पाऊल पुढे असण्यासाठी याची आवश्यकता होती.’हा निर्णय हाणून पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भ्रष्टाचार्‍यांची कोंडी करण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने नियमांत वारंवार बदल केले, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

विरोधकांची येते दया
मला माझ्या विरोधकांची दया येते. विशेषत: काँग्रेस नेतृत्वाची अस्वस्थता व्यवस्थित दिसून येते आहे. राजकीय लाभासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेसचे नेते करतात. दुसर्‍या बाजूला लोकांना त्रास होत असल्याने नाराजी वाढत असल्याचेही ते सांगतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय होऊ शकतात, असा प्रश्‍न उपस्थित करत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

नागरिकांचे पुन्हा मानले आभार

नोटाबंदीचा निर्णय हा मोठा होता, असे सांगत त्यांनी देशातील अर्थतज्ज्ञांवरही टीका केली. या निर्णयामुळे भलेभले अर्थतज्ज्ञ गडबडले. त्यांना अद्यापही या निर्णयाचा योग्य अंदाज येवू शकलेला नाही. मात्र, देशातील नागरिकांनी या निर्णयाला मनापासून पाठिबा दिला, असे सांगत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा नागरिकांचे आभार मानले.