आरटीओकडून वाहनांची होते अवेळी तपासणी

0

जळगाव, जितेंद्र कोतवाल  । मा मालवाहू, अवजड वाहने व प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनांची नोंदणी झाल्यानंतर दरवर्षी त्या वाहनाची तपासणी करून नुतनीकरण करण्यात येते. मात्र जळगाव उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन नुतनीकरणासाठी वाहन धारकांची मोठ्या प्रमाणावर हेडसांड होत असून त्यांना सांगितलेल्या वेळेत बोलावल्यानंतर तब्बल दोन ते तिन तासानंतर वाहन परवाना नुतनीकरणासाठीच्या जागेवर हजर राहून आपल्या वेळेप्रमाणे वाहनचालकांकडून प्रात्यक्षिके दाखवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. दरम्यान आपली वाहनाचे नुतनीकरणासाठी वाहनचालक वाहने घेवून सकाळपासून नियोजित जागेवर ठाण मांडून वाहन तपासणी अधिकार्‍यांची येण्याची प्रतिक्षा करीत आहे. त्यांच्या अश्या वागण्याने प्रवाशी वाहन चालक व मालवाहू गाडी धारकांचे रोजंदारी बुडत असल्याने वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवसभर रांगा लावूनही सायंकाळीच होते वाहनांची नुतनीकरणासाठी तपासणी
औद्योगिक वसाहतीत असलेल्या मोकळ्या जागेवर वाहनांची सकाळपासून रांगाच्या रांगा लावून दिवसभर वाहनचालक बसलेले असतात. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या उप प्रादेशिक परिवहन विभागातील वाहन तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही वाहनचालकांकडून होत आहे. आरटीओ विभाग वाहन नुतनिकरणासाठी वाहनाची तपासणी करून ब्रेक व इतर गोष्टी तपासणी केली जाते. यासाठी एका गाडीला जवळपास पाच ते सहा मिनीटे लागतात. मात्र कोणतेही कारण दाखवून आपली वेळ मारून नेण्याचा प्रयत्न वाहन तपासणी अधिकारी करीत आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता आले तर 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.45 वाजता आल्यानंतरच वाहन तपासणीचे काम सुरू होते.

वाहन निरिक्षण व वाहन नुतनीकरणाचे काम हे दुपारी 2.30 वाजेनंतर सुरूवात केली जाते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सुरूवातीपासून ते निकाल लागेपर्यंत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यासाठी काही अधिकारी काम करत असल्यामुळे नुतनीकरणासारखे इतरही अनेक कामांना विलंब झाला होता. लवकरात लवकर नुतनीकरणाचे कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
– जयंत पाटील,
उपप्रोदशिक परीवहन अधिकारी, जळगाव

सकाळी 11 वाजता वेगवेगळ्या तालुक्यातील आम्ही सर्व वाहनचालक वाहन नुतनीकरणासाठी आल्यानंतर मात्र वाहन तपासणी अधिकार्‍यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे दुसर्‍या दिवशीही सायंकाळी आल्यानंतरही वाहनाची तपासणी होते की नाही यांची शंका निर्माण झाली आहे. तसेच या परीसरात कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून परीसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने याचा त्रास होत आहे.
– अशोक पाटील,
सळावण ता. अमळनेर

गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी येवून रांगेत रिक्षा लावून अधिकार्‍यांची वाट बघावी लागत आहे. त्यांच्या आडमुठेपणामुळे दोन दिवसांपासून रोजंदारीवर परीणाम होत असून उपासमारीची वेळ माझ्यासह इतर रिक्षा चालकांवर येवून ठेपली आहे. काल नंबर येवूनही काम झाले नाही. आज पुन्हा वाहन तपासणीसाठी रांगेत रिक्षा लावली आहे. वाहन चालकांकडून वाहन नुतनीकरणासाठी दोन दिवसांपासून फी आकारण्यात आली आहे.
– विकास रमेश बारी, रिक्षाचालक जळगाव