आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत -उदयनराजे

0

सातारा : सातार्‍यामध्ये बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान सुरू असताना जावलीतील खुर्शीमुरा गावात उदयनराजे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. वसंत मानकुमरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला होता. या प्रकारानंतर उदयनराजे यांनी तक्रार दाखल केली होती. परंतु, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला. कार्यकर्त्यांनी शांत राहावे, भांडणातून काहीच मिळणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत मानकुमरे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. या वादात खा. शिवेंद्रराजे भोसले यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याने व बुधवारी जावली बंदची हाक दिल्याने येथील राजकारणात तणाव दिसून येत आहे.

सातार्‍याचे खासदार दहशत माजवण्यासाठी जावलीत आले होते. त्यामुळेच वसंत मानकुमरे यांचे कार्यकर्ते संतप्त झाले, असा पलटवार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. खा. उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खर्शी-बारामुरे येथे वसंतराव मानकुमरेंना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली असून हा पूर्वनियोजित कट आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मतदानाच्या दिवशी असा धिंगाणा घालणे ही त्यांची सवय आहे. सातारकरांना हे माहित आहे. जावलीतही आता त्यांनी तोच कित्ता गिरवला. पण ही दहशत खपवून घेणार नाही, असे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. खा. उदयनराजेंना भाजपची फूस असल्याचे सांगून त्यांनी बुधवारी जावली बंदची हाक दिली होती. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांनी केलेले सर्व आरोप वसंत मानकुमारे यांनी फेटाळले आहेत. उदयनराजे यांनीच मला व माझ्या पत्नीला मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच संतप्त जमावाने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली, असे मानकुमरे म्हणाले.