Private Advt

आमशा पाडवी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी

नंदुरबार : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना बळ देण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीकरिता शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अक्राणी विधानसभा मतदार संघात सेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. आमशा पाडवी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना चांगलीच टक्कर दिली होती. अवघ्या 1200 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. हा निसटता पराभव लक्षात घेऊन भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने पाडवी यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे . पाडवी हे मुंबईत असून जिल्ह्यातील काही शिवसेना नेतेही मुंबईकडे रवाना झाले आहेत. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाडवी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. यासोबतच नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदाराचे खाते देखील उघडनार आहे असल्याने सातपुडा च्या एकतर्फी राजकारणात यापुढे स्पर्धा निर्माण होणार आहे.