आमदार फोडून दाखवाच; जयंत पाटीलांचे भाजपला खुले आव्हान

0

मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान आता भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपला खुले आव्हान दिले आहे. भाजपाने आमदार फोडूनच दाखवावेच, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमचे आमदार फोडून तर बघा, असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, शिवसेनेचे आमदारही फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. भाजपाने हा प्रयत्न करून पाहावा. आम्ही त्या ठिकाणी पुन्हा आमचा आमदार निवडून आणून दाखवू, असे पाटील म्हणाले. भाजपने तसे केल्यास आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे उमेदवार देऊ. ज्या पक्षाचा आमदार फोडला जाईल, त्याच पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल आणि त्याला इतर सर्व पक्ष पाठिंबा देतील, असे म्हणत फोडाफोडीच्या राजकारणाचा मुकाबला करण्यास राष्ट्रवादी समर्थ असल्याचे म्हटले आहे.

Copy