आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का : चौघां मुलांची टीईटी प्रमाणपत्रे रद्द

औरंगाबाद : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या चौघा मुलांची टीईटी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा समोर आल्याने अनेकांवर कारवाई झाली होती तर अनेकांनादेखील अटक झाली होती. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. दरम्यान, परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

आमदारांच्या चौघा मुलांची प्रमाणपत्रे रद्द
गैरव्यवहार प्रकरणातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना कौसर अब्दुल सत्तार शेख, उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख, हुमा फरीन अब्दुल सत्तार शेख व मोहम्मद आबीर अब्दुल सत्तार यांचीदेखील प्रमाणपत्रे कायमस्वरुपी रद्द करण्यात आली आहेत.

परीक्षा देण्यास बंदी
समोर आलेल्या वृत्तानुसार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था आहेत. टीईटीमध्ये गौरव्यवहार केलेल्या तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाची यादी परीक्षा परीषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुलींसह मुलाच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना टीईटीची परीक्षा देण्यास कायस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे.