Private Advt

आबासाहेब…सरकार आपलं आहे, आपणच विरोधात बोलू तर कसं चालेल

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे आ. चिमणराव पाटील यांच्यात पुन्हा ठिणगी

जळगाव । चेतन साखरे । बिले भरूनही ट्रान्सफार्मर मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत केली. ही तक्रार करताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ‘आबासाहेब…..सरकार आपलं आहे, आपण समजून घेतलं पाहिजे, आपणच विरोधात बोलू तर कसं चालेल’ अशा शब्दात आमदार चिमणराव पाटील यांना फटकारले. दरम्यान ट्रान्सफार्मरच्या विषयावरून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी देखिल पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी सदस्यांना लिंकद्वारे जोडण्यात आले होते.

 

ट्रान्सफार्मर पुन्हा तापले
महावितरणला जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून २२ कोटीचा निधी देण्यात आला आहे. असे असतांना जिल्ह्यात बिले भरूनही शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी बैठकीत केली. त्यावर पालकमंत्र्यांनी आ. चिमणराव पाटील यांना ‘आबासाहेब सरकार आपलं आहे, समजून घ्या’ असे सांगत सत्ताधारी असल्याची आठवण करून दिली. तसेच राज्य शासनाने तीन पैकी थकीत एक बील भरल्यानंतर ट्रान्सफार्मर देण्याविषयी परीपत्रक काढले असल्याचेही पालकमंत्र्यांनी आमदार चिमणराव पाटलांना सांगितले.

शहरातील रस्त्यांसाठी लवकरच डीपीआर
नियोजन समिती सदस्य नितील लढ्ढा यांनी शहरातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याची दुरूस्ती व्हावी आणि रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हटवुन भुयारी केबल टाकाव्या अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विचारले असता शहरातील रस्त्यांसाठी लवकरच डीपीआर तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

३०-५४ साठी ७० कोटीची तरतूद करा – आ. अनिल पाटील
जिल्हा नियोजन मंडळाच्या आराखड्यात ३०-५४ आणि ५०-३४ साठी केवळ २८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ती वाढवुन ७० कोटी करावी. शाळांमध्ये स्वच्छता गृहांसाठी तरतूद वाढवावी अशी मागणी अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच पाणी टंचाईसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवला जातो. मात्र दरवर्षी तात्पुरती व्यवस्था करण्यापेक्षा स्त्रोत शोधुन कायमस्वरूपी पाणी या विषयावर तोडगा काढावा असेही आ. अनिल पाटील यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी करण्याचे आश्वासन दिले.


आम्ही जेवढे चांगले तेवढे बोगस- आमदार किशोर पाटील

वीज बिल भरूनही पिंपळगाव हरेश्‍वर या गावाला गेल्या दोन वर्षांपासून ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी संताप व्यक्त केला. महावितरणचे अधिकारी कुठलीही दाद देत नसल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत ट्रान्सफार्मरचा विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले. महावितरणकडुन होणार्‍या त्रासाबद्दल आमदार किशोर पाटील यांनी ‘आम्ही जेवढे चांगले तेवढे बोगस’ असे सांगत इशारा दिला.


कामांचे प्रस्ताव तातडीने द्या- पालकमंत्री

जिल्हा नियोजन समितीमार्फत वितरीत करण्यात आलेला निधी मार्च अखेरपर्यंत १०० टक्के खर्च करण्याच्या सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या. तसेच जी कामे अपुर्ण आहेत त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.