आपला पाल्य पालक बनू शकतो का?

0

संगमनेर तालुका येथील मांची हिल येथे ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळा असून, नुकतेच तिथे सर्व पालकांसाठी माझे आनंदी पालकत्व या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यान झाल्यावर एका मुलाचा माझ्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. असे काय विशेष कार्य या मुलाने केले होते? हा मुलगा ‘पाल्य’ असून, त्याने पालकाची जबाबदारी स्वीकारली होती. इयत्ता सातवीमधील या मुलाचे नाव गोपाळ गुंजाळ. घरात दारिद्ˆयाची परिस्थिती होती. याच्या आधीच्या शाळेेचे नाव श्रीरामप्रभू, हातगांव. याची आई विहिरीत पाय घसरून पडली व तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांवर 15 हजार रुपयांचे असलेले कर्ज ते फेडू शकत नसल्याने वडील कायमचे घर सोडून कुठेतरी निघून गेले. मुलगा काकाकडे राहायला गेला. वडिलांना पुन्हा घरी आणायचे असेल, तर वडिलांचे कर्ज फेडणे आवश्यक आहे हे या गोपाळला समजले. मग तो शाळा सांभाळून, अभ्यास करून गावामधील रानामधून कवटं, बोरं गोळा करू लागला व ते कवठं, बोरं हायवे रोडवरील चारचाकी गाड्यावाल्यांना विकू लागला. त्यातून त्याला तेराशे रुपये मिळाले. या तेराशे रुपयांमधून त्याने एक छोटी शेळी विकत घेतली. तिला वर्षभर सांभाळले. त्या शेळीला दोन पिल्लं झाली. ते वाढवले ते बोकड होते. दोन बोकड व एक शेळी त्याने 17,000 रुपयांना विकली. नातेवाइकांमधूनच कर्ज घेतले असल्याने त्या कर्जाचे पैसे व्याजासकट त्यांना तो देऊन आला. काही दिवसांत वडिलांना कुठून तरी समजले व वडील पुन्हा घरी राहायला आले. पुढे ही बातमी ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेला समजली व त्यांनी या मुलाला कायमचे शैक्षणिक दत्तक घेतले असून, तो या शाळेतच राहत आहे. म्हणून या मुलाचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत याचा फोटो पाठवला आहे. पण या सत्य घटनेवरून माझ्या मनात काही प्रश्‍न निर्माण झाले व त्याचे उत्तर देण्याचा हा प्रयत्न.

एवढ्या लहान वयात ही मुलं एवढ्या जबाबदारीने कसे वागू शकतात? मला असे वाटतं जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे व्यवस्था हातात घेण्यासाठी कोणी नसेल तर अशा वेळी व्यवस्थेचे सूत्र मुले आपल्या हातात घेऊ शकतात. फक्त मनात विधायक विचारांचे बीजे रोवलेली हवी. गोपाळला शाळेतून पुस्तकांतून कुठून तरी प्रेरणा मिळाली होती. म्हणून शिक्षण घेऊन तो कर्ज फेडत होता. हे सर्व तो कसं करू शकला? वर्षभर वडील नव्हते तो अभ्यास करता करता कवठं विकत होता, शेळ्या सांभाळत होता. नक्की मनात काय चालू असेल त्याच्या? मला वाटते की याने स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाला जिद्द होती की, वडिलांना घरी आणायचे. आणि सर्वात महत्त्वाचा ‘संघर्ष’ होता. जितका जास्त संघर्ष करावा लागतो तितकी जास्त यश मिळण्याची शक्यता वाढते.

तिसरा प्रश्‍न असा की, या वयात एवढं व्यवहार ज्ञान कुठून आले? मुले लहानपणापासून विविध अनुभव घेत असतील, तर मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. जेवढे विविध अनुभव तेवढी विविध बुद्धिमत्ता. गोपाळ तसा राना वनात वाढला, बिनचपलेचा फिरला, गाई, म्हशींबरोबर खेळला, झाडांवर चढणे, नदीवर पोहणे, शेळी सांभाळणे या विविध अ‍ॅॅक्टिव्हिटीबरोबर तो शिकतसुद्धा होता. आजचे शास्त्र सांगते की पहिल्या 12 वर्षांपर्यंत मुलं जेवढे अनुभव घेतील तेवढा मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास जास्त होत असतो.
शेवटचा प्रश्‍न : त्याच्या मनात कधी असे आले नसेल का, ‘की मला हे जमू शकणार नाही’. याच उत्तर खूप महत्त्वाचे आहे. ते असे की, त्याला ‘तू हे करू शकणार नाही, तुला हे जमणार नाही, हे अशक्य आहे. ‘असं बोलणारं आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणून हे शक्य झालं. आपण मुलांना जे समजतो मुलं स्वत:ला तशीच समजतात. ‘नाही’चा पाढा नेहमी लावला, तर मुलं मला जमू शकणार नाही असेच म्हणतात.
गोपाळच्या गोष्टीवरून आता आपण पालक म्हणून स्वत:ला काही प्रश्‍न विचारले पाहिजे.
प्रश्‍न 1) मी माझ्या मुलाला/मुलीला किती वेळा ‘तुला हे शक्य नाही’ हे म्हणतो?
प्रश्‍न 2) आपण किती आपल्या पाल्याला अनुभव दिले? त्या अनुभवांमध्ये किती विविधता असते?
प्रश्‍न 3) आपण आपल्या मुलांना किती प्रेरणादायी गोष्टी सांगतो?
प्रश्‍न 4) मॉल, व्हिडिओ गेम, मोबाइल, टीव्हीमध्ये जेवढा वेळ जातो त्या वेळात आपण आपल्या पाल्याला खेळणे, पोहणे, मैदानी खेळ असे कधी अनुभव देतो का?
प्रश्‍न 5) गोपाळने जे केले ते आपला मुलगा/मुलगी वेळ आली तर करू शकेल का? की घाबरून आत्मविश्‍वास घालून बसेल?
प्रश्‍न 6) आपल्या पाल्याला आपण संघर्षापासून नेहमी वाचवत असून सर्व गोष्टी रेडिमेड देतो का?
शोधू या या प्रश्‍नांची उत्तरे…आणि बनवू या. .अनुभवसंपन्न पालकत्व.

– सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक