आपला अंगठा, आपली ओळख

0

हेडिंग वाचून थोडं अंगूठा छाप पद्धतीला मोठं केल्यासारखं वाटेल पण असा गैरसमज होऊ देवू नका. आपला अंगठा आपली ओळख हे वाक्य यासाठी वापरलं की, निवडणूकांवरील वाढता खर्च नियंत्रणात यावा यासाठी सोलापूरमधील माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञान वापराबाबत ‘वेध भविष्याचा’ ही नवी संकल्पना मांडली आहे जी, निवडणूकांवरील खर्च तर कमी करेलच. पण त्याचबरोबर यामुळे निवडणूकांतील फसवेगिरीलाही आळा बसेल. त्याचबरोबर या संकल्पनेत आता आपल्या अंगठ्याला विशेष महत्त्व असणार आहे.

सध्या निवडणूकांचा हंगाम सुरू असल्याने सर्व ठिकाणी गोंधळ सुरू असलेला दिसतो. यंदाच झालेल्या 10 महानगरपालिका निवडणूकांसाठी झालेल्या निवडणूकांमध्ये बराच गोंधळ झालेला दिसला. निवडणूकांच्या याद्यांमध्ये मतदारांची नावे नसणे, इव्हीएम मशीनचा गोंधळ यांसारख्या गोंधळमध्ये एक विशेष गोंधळ असा होता की, मतदान केल्यानंतर हाताच्या बोटावर लावण्यात येणारी शाई बोगस निघणे. बोटावर शाई लावल्यानंतर काही वेळात हात धुतल्यास ती शाई पूर्णपणे धुतली गेली. त्यामुळे एका पेक्षा जास्त वेळा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला. अशा प्रकारच्या समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा ठपका निवडणूकांवर पडतो. परिणामी नागरिकांमध्ये सरकारविरोधात चुकीचे मत तयार होते.

या बाबींनाच आळा बसण्यासाठी वेध भविष्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची ठरेल. डिजिटल मतदार यादी असलेला टॅब थंब स्कॅनरला जोडला जाईल. मतदार त्याचा अनुक्रमांक किंवा आधार क्रमांक सांगेल. त्यानंतर ओळख पटविण्यासाठी मतदाराचा अंगठा टॅबला जोडलेल्या थंब स्कॅनर मशीनने स्कॅन केला जाईल. आधार क्रमांकातील बायोमेट्रिकशी हे अंगठ्याचे बायोमेट्रिक जुळले की, त्या मतदाराची ओळख डिजिटल स्वरुपात साठवली जाईल. त्याचबरोबर ओळख पटवण्याच्या या आधुनिक पद्धतीमुळे आयोगाला ओळखपत्रे छापण्याची गरज राहणार नाही. आपला अंगठा हीच आपली ओळख असेल. मतदान केल्याची खूण म्हणून शाई लावण्याची गरज देखील भासणार नाही. तसेच व्होटर स्लीपची गरजच राहणार नाही. यामुळे मतदान कक्ष खर्‍या अर्थानं पेपरलेस होईल आणि शाईचा घोळ राहणार मिटेल.
– प्रतिभा घडशी