आपने दिल्ली विधानसभेत दाखवले ईव्हीएम छेडछाडीचे प्रात्यक्षिक

0

नवी दिल्ली । आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर दिल्ली विधानसभेचे विशेष सत्र बोलवण्यात आले होेते. या सत्राची सुरुवातच ईव्हीएम सोबत छेडछाड या मुद्याने झाली. सभागृहात सर्वप्रथम हा मुद्दा अलका लांबा यांनी उचलला. त्या म्हणाल्या की जर ईव्हीएमवर काही संशय असेल तर त्याची चाचणी होणं गरजेचे आहे. निवडणूक आयोगाकडे नवीन ईव्हीएम असतानाही त्यांनी जुन्या मशिनवर दिल्ली महापालिकेची निवडणूक घेतली, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईव्हीएम सोबत कशी छेडछाड केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले.

ईव्हीएम मशीनच्या छेडछाडचा डेमो दाखवताना सौरभ भारद्वाज तशीच दिसणारी दुसरी मशीन घेऊन सभागृहात आले होते. तत्पुर्वी भाजपचे आमदार काम रोको प्रस्ताववर अडून बसले होते. त्याला सभागृहाचे अध्यक्ष रामविलास गोयल यांनी नामंजूर केले. दरम्यान भाजपने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ घालणर्‍या आमदाराला बाहेर काढून कामकाज सुरू करण्यात आले. त्यानंतर ईव्हीएम मशीनवर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

ईव्हीएमचे प्रात्यक्षिक बघण्यासाठी अनेक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. प्रात्यक्षिक दाखवताना त्यांनी आप, बसपा, काँग्रेस, भाजप आणि सपाला मत दिले. या प्रत्येक पक्षाला त्यांनी दोन-दोन मते दिली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे कोड देऊन मतदानामध्ये घोळ करता येतो याची माहिती दिली. त्यानंतर सौरभ भारद्वाज यांनी आपला 10 मते, बसपा, काँग्रेस, सपाला प्रत्येकी 2 मते आणि भाजपला 3 मते दिले. पण जेव्हा ईव्हीएमचा निकाल आला तेव्हा भाजपला 11 मते आणि इतर सर्व पक्षाला 2 मते असा आला.

सौरभ यांनी सांगितले की केवळ तीन तासांमध्ये पूर्ण गुजरातमधल्या ईव्हीएममध्ये घोळ करता येतो. जर घोळ केला तर भाजपला एकाही बुथवर आघाडी मिळणार नाही. त्यांनी असाही दावा केला की ईव्हीएम मशीनमध्ये फक्त मदरबोर्ड बदलायला वेळ लागतो त्यानंतर तेच होते जे पक्षाला करायचे आहे. तसेच त्यांनी हेदेखील सांगितले की मदरबोर्ड बदलायला केवळ 90 सेकंद लागतात.

इव्हीएम मशिन खरी की खोटी, होणार फॉरेन्सिक टेस्ट?
मुंबई। इव्हीएम मशिनवर होणार्‍या आरोपात किती तथ्य आहे, हे लवकरच कळणार आहे. कारण इव्हीएम मशिनची फॉरेन्सिक टेस्ट होणार आहे. हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये ही टेस्ट होईल. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर इव्हीएम मशिनची टेस्ट होणार आहे. पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते अभय छाजेड यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने हा आदेश दिला. छाजेड यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र लोकांनी त्यांना केलेल्या मतदानापेक्षा इव्हीएम मशीनमधील मतदान कमी असल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी मतदारांची प्रतिज्ञापत्रे कोर्टात सादर केली.