आपण फक्त निवडावा, लहान चोर मोठा चोर

0

ठाकरेच काय, एकही पक्षाचा नेता तुम्हाला सापडणार नाही की ज्याला भ्रष्टाचारावर चीड नाही. नगरसेवक ते पंतप्रधान असे झाडून सगळे लोक एवढ्या पोटतिडकीने या विषयावर बोलतात मग साला भ्रष्टाचार नेमका करतो कोण? हा प्रश्‍न कायमच राहतो. काही प्रश्‍न असे असतात की त्याची उत्तरे शोधणे आपल्या आवाक्यात नसते म्हणून निव्वळ चिंता व्यक्त करून सोडून देण्यापलीकडे आपल्या हातात तरी काय असते. दोन्ही ठाकरे बंधू किंवा असे असंख्य नेते आहेत, जे कधीच काही करताना, म्हणजे नोकरी, व्यवसाय, शेती करताना दिसत नाहीत, सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांच्या वाट्याला आलेली असते.

कोणत्या काळात सभ्य होती माणसे, माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? ही भीमराव पांचाळे यांनी गायलेली गझल डोक्याचा पार भुगा करून जाते. त्यांच्या आर्त स्वरांच्या संमोहनातून आपण बाहेर पडू शकलो तर गझलेचे शब्द सरळ काळजात शिरतात अन् यथावकाश तुमचा मेंदू कुरतडत असतात. खरं सांगू मला अशा कुरतडणार्‍या, सतत टोचणी देणार्‍या रचना खूप भावतात. आपल्यावर अंकुश ठेवणारे शब्दसुद्धा असतात ही किती सुंदर कल्पना आहे. शब्द अतिशय प्रभावी नियंत्रक असतात, ते तुमचे आयुष्य आमूलाग्र बदलू शकतात, रावांचा रंक आणि रामाचा नथुरामसुद्धा शब्दच घडवू शकतात हे जगभर मानले जाते. हे सगळे आठवले एवढ्यासाठी की परवा आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एका भाषणात भ्रष्टाचाराची चीड व्यक्त केली त्यावरून, त्याला आणखी बळकटी देण्यासाठी महात्मा बुद्धाचे वचन मला आठवले. बुद्ध पाच हजार वर्षांपूर्वी लोकांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते, चोरी करू नका, पाप करू नका, असत्य बोलू नका, अहंकार सोडा, धन नको माणसे जोडा. या पार्श्‍वभूमीवर माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? हा प्रश्‍न उगाच त्रास द्यायला लागला.

जुने लोक तर मोठ्या अभिमानाने सांगत असतात की आमच्या काळात असे होते, तसे होते. लोक प्रामाणिक होते, सभ्य होते हे जर खरे असेल तर हा काळ कोणता होता, कारण पाच हजार वर्षांपूर्वी बुद्धांना तेच सांगावे लागले होते याचा अर्थ आताच्या काळात आपण जसे वागतो त्याच पद्धतीने वागणारी माणसे सर्वत्र होती. एक प्रख्यात वक्ता होता.. तो जिथे जाई तिथे लोक कसे बेईमान झालेत यावर बोलायचा मात्र प्रत्येक ठिकाणी बोलताना.. इथले लोक सोडून बाकी सगळे बेईमान आहेत, असे सांगायचा. त्याचा ड्रायव्हर एक दिवस त्याला म्हणाला.. साहेब गेली महिनाभर मी ऐकतोय, तुम्ही ज्या जिल्ह्यात जाता, तो जिल्हा सोडून सगळे लोक बेईमान असल्याचे सांगता आणि आपण त्यात नाही या समाधानात लोकही टाळ्या देतात, पण तुम्ही तर सारे राज्यच बेईमान ठरवले आहे! त्यावर वक्त्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे. वक्ता म्हणाला.. जे आपण मुळात नसतो, ते आहोत हेच दाखवण्याची प्रत्येकजण धडपड करीत असतो आणि बेईमानाला सज्जन म्हटले तर त्याच्या अंगावर मूठभर मांस चढत असते. आपल्या बाजूला नाही का मूठभर मास चढलेली गर्दी असते. कधी कधी तर आपल्याही अंगावर ते कधी चढते याचाही पत्ता लागत नाही. हा.. तर मी सांगत होतो, उद्धव ठाकरे भ्रष्टाचारावर बोलले त्याबद्दल. ठाकरेच काय, एकही पक्षाचा नेता तुम्हाला सापडणार नाही की ज्याला भ्रष्टाचारावर चीड नाही.

नगरसेवक ते पंतप्रधान असे झाडून सगळे लोक एवढ्या पोटतिडकीने या विषयावर बोलतात मग साला भ्रष्टाचार नेमका करतो कोण? हा प्रश्‍न कायमच राहतो. काही प्रश्‍न असे असतात की त्याची उत्तरे शोधणे आपल्या आवाक्यात नसते म्हणून निव्वळ चिंता व्यक्त करून सोडून देण्यापलीकडे आपल्या हातात तरी काय असते. दोन्ही ठाकरे बंधू किंवा असे असंख्य नेते आहेत, जे कधीच काही करताना, म्हणजे नोकरी, व्यवसाय, शेती करताना दिसत नाहीत. पण सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांच्या वाट्याला आलेली असते. मी सोडून सगळे साले एकाच माळेचे मणी आहेत असे मानणारा मोठा वर्ग अलीकडे तयार झाला आहे. त्यांच्या सभोवती असणारा पंटर वर्गही त्याच भ्रमात आपला साहेब कसा राहील याची काळजी घेताना दिसते. काही जण तर साहेबांच्या प्रामाणिकपणाचे असे रसभरीत वर्णन करतात की खुद्द साहेबांनासुद्धा त्याची माहिती नसते. राजकीय नेते याबाबत बदनामच आहेत. परंतु, इतर क्षेत्रातील लोक काही मागे नाहीत. संधीअभावी कोट्यवधी लोक सज्जनपणातच आहेत. हा एका मित्राने केलेला विनोद खरा वाटायला लागतो. आमदार किंवा मंत्रिपदाची शपथ घेताना दुहेरी व्यक्तिमत्त्वाची अशाना देणगी एकावर फ्री मिळत असावी असे वाटते.

आपल्या समोर काही कृत्ये करणारी नेते मंडळी बाहेर गेल्यावर कसला साळसूदपणा दाखवतात ना! सध्याच्या मंत्रिमंडळातील सेनेचे एक ज्येष्ठ मंत्री करड्या शिस्तीसाठी आणि नॉन करप्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्याच्या काळात हा माणूस एवढे खर्च, जबाबदार्‍या आणि पक्षाला कसे सांभाळत असावा? हा चिंतातुर जंतू सारखा प्रश्‍न मला सुरुवातीला पडला होता. साहेबांचा स्टाफ तर त्याहीपुढे जाऊन आमच्या साहेबांना असे तसे काही आवडत नाही हे सांगताना थकत नव्हता. एका प्रसंगात साहेबांच्या आदेशाने खात्यातल्या अधिकार्‍याला पैसे देताना बघितल्यावर सार्‍यांचे पाय मातीचेच असतात. हा माझा विश्‍वास आणखी घट्ट झाला, पण साहेबांचे नाकाने कांदे सोलणे कमी झाल्याचे मात्र ऐकायला मिळाले नाही. कोणत्या काळात सभ्य होती माणसे, सभ्यतेचा काळ सांगा कोणता…जबरदस्त गझल आहे.

पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248