आनंदासाठी फुटबॉल खेळतो, सन्मानासाठी नाही

0

बार्सिलोना : बार्सिलोनाचा फॉरवर्ड खेळाडू नेमार त्याच्या चांगल्या खेळासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल देखील आहे. नेमारने तो त्याच्या आनंदासाठी फुटबॉल खेळतो, वैयक्तीक सन्मानासाठी खेळत नाही असे स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत त्याला बोलोन डी ओर पुरस्कारसाठीच्या अंतिम तीन खेळाडूत नांव नसल्याबद्दल चिंता वाटली का असे विचारले तेव्हा तो बोलत होता. तो म्हणाला, पुरस्कारासाठीच्या तीन अंतिम खेळाडूंत नाव नसल्याची चिंता वाटली नाही कारण मी वैयक्तीक सन्मानासाठी खेळत नाही.

चाहत्यांच्या मनात केले घर
ब्राझीलचा स्टार खेळाडू २४ वर्षीय नेमार म्हणाला हा पुरस्कार मिळणे खेळाडूला नक्कीच प्रोत्साहन देणारे आहे यात शंका नाही मात्र हा पुरस्कार मिळाला नाही म्हणजे माझे मरण ओढवले अशीही परिस्थिती नाही. पुरस्कार मिळाला अथवा नाही मिळाला तरी माझ्या जीवनात कांहीच फरक पडत नाही. मी फुटबॉल आनंदासाठी खेळतो व तो खेळण्याचा पुरा आनंद लुटतो. त्याच्या या वक्तव्याने त्याच्या चाहत्यांनी अजूनच त्याला डोक्यावर घेतले आहे. या गोष्टींनी निराश न होता मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत असून माझ्यासाठी माझा खेळ अधिक महत्वाचे असल्याचे त्याने सांगितले. खेळाने मला नाव दिले आहे, त्यामुळे खेळाशी आणि संघाशी प्रामाणिक राहणे माझे पहिले कर्तव्य असल्याचे नेमारने सांगितले. नेमारच्या या भूमिकेने त्याचा चाहतावर्ग कमालीचा खुश झाला आहे.