आदिवासी एकता परिषदेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन

0

धुळे । शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह आणि आश्रम शाळांच्या विविध मुलभूत समस्यांवर प्रशासनाच्या उदासिन धोरणाविरोधात व विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार 8 मार्च रोजी आदिवासी एकता परिषदेकडून एक दिवशीय धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आले. या निवेदनात शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्याचा निर्णय घेवून त्याची पुर्तता करण्यासाठी तरतूद देखील केलेली आहे. आदिवासी समाजापर्यंत योजना पोहचत नसल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.

अत्याचार करणार्‍यांना शिक्षा द्या
पिंपळनेर येथील तसेच खामगाव तालुक्यातील आश्रमशाळेतील आदिवासी मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. या दोघी पिडीतांना न्याय मिळावा तसेच अत्याचार करणार्‍यांना कडक शासन करून दोन्ही खटले जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे. तसेच पंडित दीनदयाल उपाध्य स्वयंमरोजगार योजनेऐवजी शासकीय वसतीगृहांची क्षमता वाढवून शासकीय जागेवरच वसतीगृह बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या वसतीगृहांच्या बांधकाम व वसतीगृहांसाठी जमिन हस्तांतरण करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करीत होते. या आंदोलनात हितेश पवार, राकेश पवार, दिपक लोढे, हरीश तायडे, प्रमिला शिंदे, मोनाली ठाकरे, पुनम ठाकरे, चंद्रकांत साबळे, रोशनी गावीत, नेहा वसावे, मनोज ठाकरे, राजेश अहिरे, किरन वापरासह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.

पौष्टीक आहार द्या
आदिवासी वसतीगृह, आश्रमशाळांमध्ये शौचालय, स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी त्यांना मुलभूत सुविधा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आदिवाशी वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार पुरविण्यात यावा. आदिवासी वसतीगृहांमध्ये निष्कृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार वारंवार होत आहे. या विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.