आत्महत्या प्रकरणातील संशयिताचा अटकपूर्व फेटाळला

0

जळगाव । महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप करुन चारित्र्यावर संशय घेऊन दोघांनी हिरा शिवा कॉलनीतील तरुणाला बेदम मारहाण केली. बदनामीच्या भितीने त्या तरुणाने 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका संशयिताने अतिरीक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालायात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी फेटाळला आहे. हिराशिवा कॉलनीत केदार सुभाष पाटील (वय 26) याचे परिसरात राहणार्‍या एका महिलेशी संबंध होते.

केदारला केली होती दोघांनी बेदम मारहाण
तो त्या महिलेला दुचाकीने दुकानात सोडत असे, असा आरोप करीत परिसरातच राहणार्‍या गजानन सुदाम निकम (वय 28, रा. हिराशिवा कॉलनी), गौरव युवराज सोनवणे या दोघांनी केदारला 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास निमखेडी रस्त्यावरील कृषी तंत्र विद्यालयासमोर नेऊन अंधारात बेदम मारहाण केली. त्या महिलेचा नांद सोड, ती आमची नातेवाईक आहे, असे दोघांनी केदारला सांगितले. तसेच मारहाण करीत असल्याचे रेकॉर्डिंग मोबाइलमध्ये केले. या घाबरलेल्या केदारने 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी गजनान निकम आणि गौरव सोनवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गौरव सोनवणे याने न्यायाधीश हंकारे यांच्या न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणातील दुसरा संशयीत गजानन निकम याला तालुका पोलिसांनी 27 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.