आत्महत्त्येस प्रवृत्त करणार्‍या संशयितास अटक

0

जळगाव । हिराशिवा कॉलनीतील केदार पाटील या तरूणाने आत्महत्या केली होती. यानंतर केदारच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरूध्द आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तालुका पोलिसांनी रविवारी रात्री गजानन निकम या एका संशयितास अटक केली. त्याला सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोघांकडून बेदम मारहाण हिराशिवा कॉलनीत केदार सुभाष पाटील (वय 26) याचे परिसरात राहणार्‍या एका महिलेशी संबंध होते. तो त्या महिलेला दुचाकीने दुकानात सोडत असे, असा आरोप करीत परिसरातच राहणार्‍या गजानन सुदाम निकम (वय 28, रा. हिराशिवा कॉलनी), गौरव सोनवणे या दोघांनी केदारला 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास निमखेडी रस्त्यावरील शेतकी विद्यालयासमोर नेऊन अंधारात बेदम मारहाण केली. त्या महिलेचा नांद सोड, ती आमची नातेवाईक आहे, असे दोघांनी केदारला सांगितले. तसेच मारहाण करीत असल्याचे रेकॉर्डिंग मोबाइलमध्ये केले. केदारकडून काही गोष्टी वदवूनही घेतल्या. या प्रकारामुळे हताश होऊन केदार घरी आला. घाबरलेल्या केदारला त्याचे वडील सुभाष आई शीला यांनी विचारपूस केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

सोनवणेच्या शोधार्थ पथक रवाना
या घटनेमुळे केदार पूर्णपणे हताश झाला होता. आई, वडीलांनी केदारची समजूतही काढली होती. त्यानंतर आई-वडील स्वामी समर्थ मंदिरात आरतीसाठी गेले. त्यावेळी केदारने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सुसाइड नोट सापडली. त्यात घडलेला सर्व प्रकार लिहून जबाबदार असणार्‍यांना शिक्षा व्हायला हवी असा उल्लेख केलेला होता. त्यामुळे केदारच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजनान निकम आणि गौरव सोनवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही संशयीत फरार होते. त्यापैकी गजानन निकम याला तालुका पोलिसांनी रविवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास अटक केली. त्याला सोमवारी न्या. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणातील गौरव सोनवणे हा अजून फरार आहे.