आता विराट ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचाही कर्णधार!

0

मेबलबर्न : आपल्या जबरदस्त कामगिरीने भल्याभल्यांना चकित करणारा आणि विक्रमावर विक्रम करणाऱ्या भातीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक चमत्कार केला आहे. विराट कोहलीची फलंदाजी आणि कप्तानीची भूरळ आता परदेशी क्रिकेटप्रेमींनाही पडू लागली आहे. म्हणूनच की काय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे. त्याआधी आयसीसीने निवडलेल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वसुद्धा विराटकडे सोपवण्यात आले होते. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या सर्वोत्तम कसोटी संघात विराटला स्थान दिले असून त्याला संघाचे नेतृत्त्वपद देखील दिले आहे.

जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला यावर्षीचा एकदिवसीय संघ आज जाहीर केला. आश्चर्याची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथऐवजी विराट कोहलीकडे सोपवले आहे. विराटबरोबरच जसप्रीत बुमराहलाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डि काँक, इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा बाबर आझम यांचीही या संघात निवड करण्यात आली आहे. “विराट यावर्षी केवळ 10 एकदिवसीय सामनेच खेळला, पण या दहा सामन्यांपैकी 8 डावांत त्याने 45 हून अधिक धावांच्या खेळी केल्या. धावांचा पाठलाग करताना भारताने मिळवलेल्या 59 विजयांमध्ये विराटच्या फलंदाजीची सरासरी 90.10 इतकी आहे,” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराटची निवड करताना म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या संघांमध्ये विराट कोहली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, क्विंटन डिकाँक, स्टीव्हन स्मिथ, बाबर आझम, मिचेल मार्श, जोस बटलर, जसप्रीत बुमराह, इम्रान ताहीर यांचा समावेश आहे.