आता राज ठाकरेंनी शिवसेनेचे नाक कापायचे ठरवले तर?

0

मुंबई : मराठी अस्मितेची कसोटी असल्यानेच शिवसेनेशी युती करून भाजपाला पराभूत करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पाठवला होता. तो घेऊन आलेल्या बाळा नांदगावकर यांना अपमानित करून माघारी पाठवण्यात आले होते. आता तोच अपमान भरून काढण्यासाठी मनसेने आपले वजन भाजपाच्या पारड्यात टाकले, तर शिवसेनेची पुरती नामुष्की होण्याची शक्यता आहे. कारण मनसेने साथ दिली तर भाजपाचा महापौर मुंबईत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सेनेला अपक्ष व बंडखोरांना सोबत घेऊनही 88 पुढे मजल मारता आलेली नाही. मनसेने भाजपा सोबत जायचे ठरवल्यास त्यांची बेरीज 89 इतकी होते.

कॉग्रेसने सेनेला पाठींबा दिल्यास सेनेचे काम सोपे होईल. पण त्यामुळे कॉग्रेसला देशात प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. म्हणूनच मग पर्याय म्हणून कॉग्रेस अन्य पक्षांच्या मदतीने तिसरा उमेदवार मैदानात आणायच्या तयारीत आहे. त्यामुळे सेना विरुद्ध भाजपा अशीच अंतिम लढाई होते. त्यात सेनेने आतापर्यंत केलेली गोळाबेरीज 88 पर्यंतच अडकली आहे. तर भाजपाने कोणाकडे विचारपुस केलेली नाही. अशा वेळी मनसेचे सात नगरसेवक भाजपाकडे गेल्यास 89 हा निर्णायक आकडा होऊ शकतो. मात्र तशी शक्यता असली तरी हालचाली सुरू झालेल्या नाहीत.

जुन्या भांडणासाठी राजला अपमानित करण्याचे जे षडयंत्र उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी खेळले गेले. त्यात मनसेची नाचक्की नक्कीच झाली. पण आता बहूमताची गणिते जमवताना मनसेच्याच सात जागा बहूमोल झाल्या आहेत. पण राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची हिंमत कुणा शिवसेना नेत्याकडे राहिलेली नाही. राज ठाकरेंनी सतत केलेला फ़ोनही घ्यायला नकार देणार्या पक्षप्रमुखांना आता कुठल्या तोंडाने मनसेची मदत मागता येईल? हा सवाल अनेक मनसे कार्यकर्ते उघडपणे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे़च मुंबईच्या महापौराचा विषय अधिक गुंतागुंतीचा होऊन गेला आहे.