आता याहू मेलवरही कॉलर आयडीची सुविधा

0

मुंबई । याहू मेलच्या ताज्या अपडेटमध्ये कॉलर आयडीची सुविधा प्रदान करण्यात आली असून हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीसाठी देण्यात आले आहे. याहू मेलने आपल्या ताज्या अपडेटमध्ये दोन नवीन फिचर दिले आहेत. यातील पहिले फिचर हे कॉलर आयडीचे आहे. परिणामी आता याहू मेलच्या इनबॉक्समध्ये असणार्‍या कोणत्याही व्यक्तीने त्या युजरला कॉल केला असता त्याची छायाचित्रासह माहिती दिसणार आहे. हे फिचर अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी सेटींग-फोन-कॉल ब्लॉकींग अँड आयडेंटीफिकेशन असे जाऊन आवश्यक ते बदल करावेत.

यासोबत याहू मेलमध्ये फोटो अपलोडींगबाबत एक अभिनव सुविधा मिळणार आहे. यात कुणीही डेस्कटॉपवर याहू मेलवर लॉगीन केले असता त्याला त्या अकाऊंटशी अटॅच असणार्‍या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातील छायाचित्रे शोधता येणार आहेत. कृत्रीम बुध्दीमत्तेच्या आधारे यातील फोटो सर्च करता येतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या मदतीने डेस्कटॉपवरून कॅमेर्‍यातील फोटो डिलीट करता येतील. हे फिचर अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी सेटींग-फोटो अपलोड असे जाऊन आवश्यक ते बदल करावेत.