आता महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर !

0

मुंबई : महापारेषण कंपनीने उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतील सुधारणेसाठी आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पारेषणच्या वीजवाहिन्यांवरुन (ट्रान्समिशन लाईन) ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्याद्वारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी करण्यासह उत्पन्नवाढीसाठी त्याचा व्यवसायिक वापर करण्याचे बिझनेस मॉडेल तयार करा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. त्यामुळे ट्रान्समिशनमध्ये अमूलाग्र सुधारणा होऊन राज्यातील वीज वितरणाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच दळणवळण (कम्युनिकेशन) क्षेत्रासाठी ही व्यवस्था मोठी फायदेशीर ठरुन ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल.

महापारेषणच्या पारेषण शुल्काच्या (ट्रान्समिशन चार्जेस) अनुषंगाने डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी २८ रोजी एमएसईबी होल्डींग कंपनी सभागृहात बैठक पार पडली.

राज्यात महापारेषणचे 45 हजार कि. मी. लांबीचे वाहिन्यांचे जाळे असून या वाहिन्यांवरुन वीजेच्या तारेखाली ऑप्टिकल फायबर केबल टाकून सर्व सबस्टेशन जोडता येतील. त्याचा फायदा पारेषणच्या संदेशवहन यंत्रणेत गतीमानता आणि आधुनिकता येऊन देखभाल दुरुस्ती तसेच कोठे बिघाड असल्यास तात्काळ त्यावर काम करणे सोपे होईल. मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणामुळे तर याची गरज लक्षात आली असून त्यावर तात्काळ काम सुरू करावे, अशा सुचना डॉ. राऊत यांनी दिल्या.

Copy