आता नागरी, सहकारी बँका रडारवर!

0

मुंबई : देशभरात ठिकठिकाणी धाडसत्र सुरू असून, प्राप्तिकर विभागाने आता नागरी व सहकारी बँकांभोवतीचा कारवाईचा फास घट्ट आवळला आहे. मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सहकारी बँकांमध्ये उघडण्यात आलेली खाती अथवा कार्यान्वित झालेल्या बँक खात्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. जवळपास 4500 बँक खात्यांचे व्यवहार तपासले जात असून, नोटाबंदीनंतर दीड महिन्यात या खात्यांमध्ये चलनातून बाद झालेल्या नोटांच्या स्वरुपात जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये जमा करण्यात आले होते. ही सर्व खाती महाराष्ट्र, गोवा आणि दमणमधील सहकारी बँकांमधील आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नोटाबंदीनंतर उघडली गेली तीन हजार नवीन खाती
नोटाबंदीच्या दोन दिवसांनी म्हणजेच 10 नोव्हेंबरनंतर अशी जवळपास 3000 नवीन खाती आढळून आल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यात 1500 हून अधिक खाती निष्क्रीय होती. ती नोटाबंदीनंतर कार्यान्वित झाली आहेत, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 60 खात्यांमध्ये नोटाबंदीनंतर जुन्या नोटांच्या स्वरुपात रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर लगेच ती रक्कम दुसर्‍या खात्यांमध्ये वळवण्यात किंवा बँक खात्यातून काढण्यात आली आहे. काही रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे दुसर्‍या खात्यांमध्ये वळवण्यात आली. ही रक्कम काढल्यानंतर लगेच ही खाती बंद करण्यात आली असल्याचेही तपासात आढळून आले. प्राप्तिकर विभाग या खात्यांची सखोल चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही बँकांनी जुन्या नोटांचा आकडा फुगवला
प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत 250 हून अधिक खातेधारकांना नोटीस बजावली असून, ही यादी आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. नोटाबंदीनंतर काही बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जुन्या स्वरुपात जमा झालेल्या रकमेचा आकडा फुगवून सादर केला आहे. या बँकांकडून मिळालेली माहिती रिझर्व्ह बँकेला प्राप्तिकर विभागाकडून देण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. नोटाबंदीनंतर अनेक खासगी आणि सहकारी बँका सरकारी यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. मुंबईत 15 डिसेंबरला एका खासगी वाहनात 10 कोटी 10 लाखांची रोकड पोलिसांनी पकडली होती. त्यात चलनातून बाद केलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांचाही समावेश होता. ही रोकड वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेची असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सीबीआयने वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेच्या दोन अधिकार्‍यांवर गुन्हाही नोंदवला आहे. यासंबंधी बीड, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईतील 11 ठिकाणीही चौकशी केली आहे.