आता तरी सुधरा; देशभरात कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढला

0

नवी दिल्ली- लॉकडाऊन व सोशल डिस्टसिंगला नागरीक अजूनही गांभीयार्र्ंने घेत नसल्याने देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १९९० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती २६ हजार ४९६ पर्यंत पोहोचली आहे. देशात आतापर्यंत केवळ २४ तासांत सापडलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार झालेला नाही. मात्र काही शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील केवळ २७ जिल्ह्यात कोरोनाचे ६८.२ टक्के रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच काळात ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ५ हजार ८०४ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. लॉकडाऊनचे पालन होत नसल्याने देशातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

Copy