आता घरबसल्या मागविता येणार दारु ?

0

मुंबई : मद्यपान करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून आता घरबसल्या दारुची होम डिलीव्हरी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारची ही नवी योजना असून राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी या योजनेसंबधी माहिती दिली. सरकारने या योजनेसंदर्भात निर्णय अमलात आणला तर तुम्ही घरबसल्या तुम्हाला हवी ती दारु मागवू शकता. या निर्णयामुळे मद्य विक्री उद्योगात निश्चितच बदल होणार असून असा वेगळाच निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असणार आहे.

का घेतला निर्णय ?

दारु पिऊन गाडी चालवू नका, असे अनेकदा सांगूनही अनेक जण गाड्या चालवतात. त्यामुळे दारुच्या नशेत आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत, या अपघातात अनेकांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय विचाराधीन असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ज्यांना हवे असेल ते घरी बसून मद्य पिऊ शकतील. त्यामुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल.

कशी असेल ही होम डिलीव्हरी ?

देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारातील दारु ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. ई- कॉमर्स वेबसाईटवरुन तुम्हाला दारु विकत घेता येणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही भाज्या आणि फळांची खरेदी करता अगदी त्याच पद्धतीने दारु देखील घेता येणार आहे.

ऑर्डर करु शकणार ट्रॅक

इतर ऑनलाईन ऑर्डरप्रमाणे तुम्हाला तुमची ऑर्डर कुठे पोहोचली हे ट्रॅक करता येणार आहे. या बाटलींवर जियो टॅग लावण्यात येणार आहे. त्यामुळेच ही ऑर्डर ट्रॅक करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर वकिल श्रीरंग भांडारकर यांनी सांगितले की, यामुळे अनेकांचा वेळ वाचेल आणि डिलीव्हरी बॉईजना नोकरी मिळेल.

Copy