अठरा लाख उत्पन्न असणार्‍यांनाही सूट!

0

नवी दिल्ली । जर तुम्ही प्रथमच घर खरेदीसाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला 2.4 लाखाचा फायदा होईल. म्हणजे सरकार तुम्ही घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजावर सबसिडी देणार आहे. सध्या ही सबसिडी फक्त 6 लाख वार्षीक उत्पन्न असणार्‍यांसाठीच आहे. जर तुमचे वार्षीक उत्पन्न 18 लाख रूपयांपर्यंत असेल तरीही आता या योजनेचा लाभ होणार आहे. मागच्या वर्षी 31 डिसेंबरलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन सबसिडी योजनांची घोषणा केली होती. मात्र, त्याची विस्तृत माहिती आता दिली गेली आहे.

सर्वांना पक्के घर

रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आणण्यासाठी आणि 2022पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकारने सबसिडीचे दोन स्लॅब बनवले आहेत. दोन्ही स्लॅब्स 15 वर्षांऐवजी आता 20 वर्षांपर्यंतच्या गृहकर्जांना लागू होतील. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत व्याजावर मिळत असलेली सबसिडी ही प्राप्तिकरमध्ये मिळणार्‍या सवलती व्यतिरिक्त आहे.

अशी आहे योजना : नव्या योजनेनुसार घर खरेदीदाराला त्याच्या उत्पन्नाच्या आधारे सबसिडी मिळेल. जर वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असेल तर 6 लाख रूपयांपर्यतच्या कर्जाच्या व्याजावर 6.5 टक्के दराने सबसिडी मिळेल. कर्जाची रक्कम कितीही असली तरी सबसिडी 6 लाख रूपयांच्या मूळ रकमेवर मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त रकमेवर ही सवलत मिळणार नाही. जर तुम्ही 9 टक्के दराने 20 लाख रूपयांचे कर्ज घेतले असेल तर 6 लाख रूपयांवर फक्त 2.5 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

तर उर्वरित 14 लाख रूपयांच्या कर्जावर 9 टक्केच व्याज द्यावे लागणार आहे. वार्षिक उत्पन्न 12 लाख रूपये असलेल्यांना 9 लाख रूपयांपर्यंतच्या गृहकृजावर सरकार 4 टक्के सबसिडी देईल. तर 18 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नधारकांना 12 लाख रूपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर 3 टक्के सूट मिळेल. जर 9 टक्के व्याजदरावर कर्ज घेतले तर तीन वर्गवारीच्या सबसिडीतून 20 वर्षांच्या कर्जावर सुमारे 2 लाख 40 हजार रूपयांचा फायदा होईल आणि कर्ज परतफेडीच्या मासिक हप्त्यात 2200 रूपये कमी होतील.

मध्यम उत्पन्न वर्गालाही लाभ

नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी), हुडकोवर सबसिडी देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कमी उत्पन्न वर्गासाठी सबसिडी योजनेतंर्गत सरकारने आतापर्यंत 18 हजार लोकांना एकूण 310 कोटी रूपयांची सबसिडी दिली आहे. आता नव्या निर्णयामुळे मध्यम उत्पन्न वर्गही या योजनेत समाविष्ठ होणार आहे.