आता ऑस्ट्रेलियाची बारी!

0

पुणे : न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेशला मोठ्या फरकाने आणि दणदणीत मात करून विजयश्री प्राप्त केलेल्या टीम इंडियाला आता तगड्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. मात्र ऑस्ट्रेलियास नमविण्यास टीम इंडिया सज्ज झाली असून टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. यामध्ये विशेष कुठलाही बदल झालेला नसून बांगलादेशविरुध्दचा संघ कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघाचे मुंबईत आगमन झाले आहे. बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील सलामी लढत २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळली जाणार आहे.

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित

खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहली म्हणाला, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात इंग्लंडविरुद्धची मालिका मोठी होती. त्यात आम्ही ४-० ने सरशी साधली. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत. आमचे प्रत्येकाचे लक्ष आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे.

आॅस्ट्रेलियाचा संघ भारतात

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघाचे सोमवारी मुंबईत आगमन झाले. बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील सलामी लढत २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ दुबई येथील सराव शिबिर आटोपल्यानंतर मुंबईत दाखल झाला आहे. विमानतळाहून संघ थेट दक्षिण मुंबईतील हॉटेलसाठी रवाना झाला. ऑस्ट्रेलिया संघ ब्रेबोर्न स्टेडियममध्ये १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ उद्यापासून, १५ फेब्रुवारी रोजी पहिल्या सराव सत्रात सहभागी होणार आहे.

टीम इंडिया करणार नवा जागतिक विक्रम
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया आता एका नव्या जागतिक विक्रमाजवळ पोहोचली आहे. सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवत भारत वर्ल्ड रेकॉर्ड जवळ आहे. इंग्लंडने एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सलग नऊ सिरीजमध्ये विजय मिळवला आहे. पण आतापर्यंत एकही भारतीय कर्णधार हे करू शकलेला नव्हता. पण विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी करून दाखवली आहे. बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी जिंकत भारतीय संघाने सलग सहा कसोटी मालिकांमध्ये विजय आणि इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिका जिंकली आहे. यावेळी कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल १९ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली आहे.

नवी ठिकाणांवर सामने

या मालिकेचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी तीन कसोटी नवीन ठिकाणी होणार आहेत. पुणे, रांची आणि धर्मशाला येथील स्टेडियमला पहिल्यांदाच कसोटीचे यजमानपद मिळाले आहे. त्यामुळे या ठिकाणी खेळपट्टी नेमकी कशी असेल, हे सांगणे अवघड आहे. फिरकीला मदत देणार्‍याच खेळपट्ट्या तयार केल्या जातील, यात शंका नसली तरी नवीन कोणत्या दिवसापासून मदत मिळण्यास प्रारंभ होईल याची अंदाज बांधता येत नाही. कारण जुने स्टेडियम असल्याचे मागच्या रेकॉर्डवरून सहज अंदाज बांधता येतो. अर्थात भारताकडे फिरकीचे रामबाण असल्याने कांगारूंना घायाळ करू शकतील इतकी ताकद खेळपट्टीत नक्कीच असेल. ऑस्ट्रेलियाला गेल्या अनेक वर्षांत भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.