आता एअरपोर्ट सारखंच असणार बसपोर्ट

0

 मुंबई । राज्यात एसटी बस स्थानकांच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 13 ‘बसपोर्ट’ची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातल्या 13 महत्वाच्या बस स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यातील 9 बस पोर्टचा आराखडा तयार झाला असून 9 डेपोंची आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात येणार आहे. यामध्ये विमानतळावर ज्या सुविधा मिळतात, त्या एसटीच्या प्रवाशांसाठी दिल्या जातील. यामध्ये एसटी डेपो आणि आगारचा काही भाग व्यापारी वापरांसाठी दिला जाणार असून, याची मूळ मालकी एसटी महामंडळकडे असणार आहे. यामधून एसटी महामंडळला उत्पन्न मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. राज्यात लवकरच आधीच्या तुलनेत मोठ्या संख्येने वातानुकुलित बस सेवा सुरु केली जाणार आहे. याला साजेशी एसटी महामंडळ बसपोर्ट उभारली जाणार आहेत. यामुळे एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओघ वाढणार असुन विमान सेवेप्रमाणे आता बस सेवाही अत्याधुनिक रुप घेणार आहे.

30 वर्ष देखभाल कंपनीकडे
पनवेल, बोरीवली, नागपूर, पुणे, नाशिक ही बस स्थानके एअरपोर्टच्या धर्तीवर आता ‘बसपोर्ट’ होणार आहे. एसटी महामंडळावर एक पैशाचाही बोजा न पडता खाजगीकरणाच्या माध्यमातून या अत्याधुनिक 13 बस पोर्टची बांधणी केली जाणार आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे. 13 मोठ्या बस आगारांचा समावेश केला गेला आहे. सांगली, पुणे, नाशिक, पनवेल, बोरिवली नॅन्सी कॉलनी, जळगाव, धुळे, कोल्हापुर, संभाजीनगर, सोलापुर, अकोला, नागपूर, या आगारांचे ‘बसपोर्ट’ मध्ये रुपांतर केले जाणार आहे. टेंडर प्रक्रिया पार करून आलेल्या कंपनीला ‘बसपोर्ट’ विकसित करण्याच्या मोबदल्यात व्यापार संकुल उभारण्यास एसटी महामंडळाच्या आगारांची जागा देणार आहे. या बसपोर्टची देखभाल पुढील 30 वर्षे संबंधित कंपनीलाच करावी लागणार आहे

अशा सुविधा असतील नवीन बसपोर्टमध्ये
भविष्यात लागणार्‍या सुविधांचा वेध घेऊन सर्व तेरा ठिकाणी एकसारखाच आराखडा
व्यापारी संकुलाचा वेगळा आराखडा
बस पोर्टमधील सोयीसुविधांचे व्यवस्थापन बांधकाम करणार्‍या कंपनीकडेच
प्रत्येक बस पोर्टमध्ये सोलर पॅनेल व पर्जन्य जल पुनर्भरणाची सोय
बस येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग; तर प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था
प्रवाशांसाठी प्रतिक्षा कक्ष, त्यात बसची माहिती देणारे अत्याधुनिक फलक, रेस्टॉरंटचा समावेश
पनवेलसारख्या ठिकाणी बस पोर्ट व रेल्वे स्थानक एकमेकांना स्काय वॉकशी जोडणार
स्काय वॉकवरच शॉपिंग सेंटर असणार व त्याची मालकी एसटी महामंडळाकडे

या 13 स्थानकांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सर्व सुविधांयुक्त स्थानके उभारण्यासाठी परिवहन विभागाने 44 वास्तुविषारदांची नेमणूक केली आहे. राज्यातल्या अनेक स्थानकात मिनी थिएटर उभारण्याची तयारी आहे. त्यात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन दिवाकर रावते यांनी दिली. हा महत्वकांक्षी प्रकल्प पुढच्या 2 वर्षात पूर्णत्वाला येईल,
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री