आतापर्यंत राज्यात फक्त 27 टक्केच पेरण्या

0

पुणे विभागात केवळ 3.62 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या : उत्पादनात घट होण्याची शक्यता

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम हा रब्बी पिकांवर झाला आहे. आतापर्यंत राज्यात फक्त 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. आगामी काळात तर, पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याने हे प्रमाण आणखी घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता अधिक असून तेथे फक्त 3.62 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे यंदा येथील उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात साधारणतः खरीप आणि रब्बी अशी दोन पिके घेतली जातात. खरीपाचे क्षेत्र जास्त आहे. त्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र कमी आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र हे 56.93 लाख हेक्टर इतके आहे. आज अखेरपर्यंत सुमारे 15.51 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण गतवर्षी पेक्षा कमी आहे. गेल्यावर्षी सुमारे 40 टक्क्याच्या आसपास रब्बी पिकाच्या पेरण्या झाल्या होत्या.

पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता अधिक

कमी पावसामुळे पुणे विभागात यंदा रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. या विभागात रब्बीचे क्षेत्रसुद्धा तब्बल 17.83 लाख इतके आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत याठिकाणी निम्म्याहून अधिक पेरण्या होणे आवश्यक होते. पण फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. म्हणजे 3.62 लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा पिक उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागानेच व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती भीषण आहे. कमी पावसामुळे ऊससुद्धा खुंटला आहे. त्याचबरोबर हुमणीनेसुद्धा आक्रमण केले आहे. राज्यात उसावर जो हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पुणे विभागात सर्वात जास्त म्हणजे 64 हजार हेक्टरपेक्षा अधिक ऊस या रोगाने व्यापला आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक पेरण्या

राज्यातील विभागवार झालेल्या पेरण्यांच्या अहवालानुसार अमरावती विभागात सर्वाधिक म्हणजे 45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या विभागात रब्बीचे 6.47 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 2.88 हेक्टर क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर विभागातसुद्धा तब्बल 40 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या विभागात 5.07 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 2.02 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्याचबरोबर लातूर आणि औरंगाबाद विभागातसुद्धा चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. लातूर विभागात 32 टक्के तर, औरंगाबाद विभागात 15 टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोकण विभागात 23 टक्के तर नागपूर विभागात 32 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

औरंगाबाद विभागात तीव्र पाणी टंचाई

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता औरंगबाद विभागात सगळ्यात कमी पेरण्या झाल्या आहेत. या विभागात 7.73 लाख हेक्टर असून आत्तापर्यत फक्त 1.17 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. या विभागातील अनेक ठिकाणी आत्तापासूनच तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी आहे. अशाच ठिकाणी सध्या पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. सध्या अनेक भागात उसाचेच पिक आहे. त्याउलट लातूर विभागात 11.15 लाख हेक्टर हे रब्बीचे क्षेत्र आहे. त्यापैकी 3.56 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. याठिकाणी हरभरा आणि करडई पिकाची लागवड जास्त प्रमाणात केली आहे. पाणी टंचाईमुळे ज्वारीच्या पेरण्या यंदा घटल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे रब्बीला जीवदान

गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात होणार्‍या अवकाळी पावसामुळे रब्बीला जीवदान मिळाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक भागात हा पाऊस झाल्याने ज्या भागातील पाणी साठे अगदी तळाला गेले होते. तेथे या पावसाने थोडा फरक पडला आहे. त्याचबरोबर पाणी नसल्यामुळे ज्या भागातील पेरण्या रखडल्या होत्या, त्याभागात पाऊस झाल्याने आता पेरण्या होऊ शकतात. सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागात या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सातारा, सांगलीमधील द्राक्ष बागायतदारांना मात्र या पावसाचा फटका बसणार आहे, असे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे.

Copy