…आणि धोनीने मागितले आयपीएलमध्ये डीआरएस

0

पुणे। एकदिवसीय क्रिकेट आणि आपल्या कर्णधारपदाच्या भूमिकेतून महेंद्रसिंग धोनी बाहेर निघायचे नावच घेत नाहीये. पुणे आणि मुंबई दरम्यान झालेल्या कालच्या सामन्यात देखील धोनीने अशीच भूमिका घेतल्याने त्याला पंचाला उत्तर द्यावे लागले. आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपदाशिवाय खेळणा-या महेंद्रसिंह धोनीसाठी गुरुवारचा दिवस चांगला ठरला नाही. धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंटस संघाने अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला खरा, पण धोनीला त्याच्या वर्तनासाठी सामनाधिका-यांकडून चारशब्द ऐकून घ्यावे लागले. सामन्या दरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामनाधिकारी मनू नय्यर यांनी धोनीला बोलवून समज दिली.

धोनीचे वर्तन दंड करण्याइतपत मोठे नसले तरी, खेळभावनेला तडा देणारे असल्याने धोनीला समज देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीरने टाकलेला चेंडू मुंबई इंडियन्सच्या किरेन पोलार्डच्या पॅडवर लागला. त्यावर पुणे संघाने पायचीतचे अपील केले. पण पंच एस रवी यांनी अपील फेटाळून लावले. त्यावर धोनीने डीआरएसचा कौल मागणारे हातवारे केले. वास्तविक आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. धोनीचे हे वर्तन आक्षेपार्ह वाटल्याने त्याला सामनाधिका-यांनी बोलवून समज दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय नाही पटला तर, डीआरएस सिस्टीमव्दारे पुन्हा दाद मागता येते. नुकत्याच संपलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने डीआरएसचा कौल घेण्यापूर्वी पॅव्हेलियनकडे मदत मागितली होती. विराट कोहलीने यावर टीका केल्यानंतर हा वाद बराच गाजला होता.