आणखी एका भारतीयावर प्राणघातक हल्ला

0

वॉशिंग्टन : अवघ्या पंधरा दिवसात अमेरिकेत आणखी एका भारतीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. ही तीसरी घटना आहे. या हल्ल्यात 39 वर्षीय पंजाबी भारतीय दीप राय यांच्यावर एका अमेरिकन नागरिकाने गोळी झाडली. गोळी झाडण्यापुर्वी हा व्यक्ती म्हणाला, आमच्या देशातून चालता हो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीप यांच्या खांद्याला गोळी लागली असून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. परपराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दीप यांच्या वडीलांशी फोनवरून संपर्क साधला. या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वराज यांनी चिंता व्यक्त केली आहे. गुरूवारी झालेल्या हल्ल्यात मरण पावलेले हरनिश पटेल यांच्या मृत्यूबद्दलही स्वराज यांनी दु:ख व्यक्त केले.

अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी या तिसर्‍या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला असून आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे. दीप यांच्यावर हल्ला करताना हल्लेखोर जे वाक्य बोलला आहे, त्याच्यावरून पुन्हा एकदा कंसासमध्ये झालेल्या श्रीनिवास यांच्या हत्येची आठवण ताजी झाली आहे. श्रीनिवास यांनाही अशाच प्रकारे शब्दप्रयोग करून ठार मारण्यात आले होते.

याशिवाय गुरूवारीही साऊथ कॅरोलिनात एका मुळ भारतीय वंशाच्या उद्योजकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या सर्व हत्यांच्या मागे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक काळातील वक्तव्यांची छाप दिसून येत आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या बाहेरून येणार्‍यांना दुय्यम दर्जाचे नागरिक असल्याचे म्हटले होते. व त्यांच्यावर निर्बंध लादण्याबाबत सातत्याने म्हटले होते.

कंसासमध्ये भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोटलावर झालेल्या हल्ल्यानंतर बर्‍याच दिवसांनतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंड उघडले, व या हत्येचा निषेध केला. याबद्दलही येथील भारतीयांच्या मनात नाराजी आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तरीही भारतीयांवरील हल्ले थांबलेले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होण्यापुर्वीच अशा प्रकारचे संकट भविष्यात ओढावणार याचे संकेत मिळत होते. यासंबंधी स्वत: पेप्सीच्या चेअरमन इंदिरा नुयी यांनी जाहीर वक्तव्य केले होते. नुयी यांच्या मुलाने त्यांना म्हटले होते की, आता येथे राहणे सुरक्षित नसेल. मुलाच्या या वक्तव्याने त्यांना आश्‍चर्य वाटले होते. हाच प्रसंग नुयी यांनी सांगितला होता.