Private Advt

आढावा बैठकीत नागरीकांनी वाचला तक्रारींचा पाढा

सावदा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक : तक्रारींचे निरसन करण्याचे आदेश

सावदा : कोचूर रोडवरील नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विविध समस्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत नागरीकांनी तक्रारींचा पाढा वाचला. पालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सोमेश्वर नगर, निमजाय माता नगर, कृषी उत्पन्न बाजार समितीा परीसरातील नागरीकांनी परीसरातील रस्त्यांसह पिण्याचे पाणी व स्वच्छतेबाबत तक्रारी केल्या. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सदर भाग नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झाला असून येथे पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी योजना मंजुरीसाठी पाठवली असून टीपीआर मंजूर असून तो मंजूर होताच कामाला सुरूवात होईल, असे आश्‍वासन दिले. पाईप लाईन टाकावी म्हणजे रस्ते झाल्यावर पुन्हा खोदावे लागणार नाहीत, अशा सूचना आमदारांनी केल्या. गटारींचेदेखील काम केले जाणार असून घंटागाडीदेखील सुरू करण्यात येणार आहेत.

आमदार म्हणाले, पाणीपपुरवठा योजनेबाबत पाठपुरावा करणार
आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेबाबत आपण स्वत: पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. बुधवार परीसरातील नागरीकांनी मोकाट डूकरांचा त्रास वाढल्याची तक्रार केली. लॉकडाऊनमध्ये सक्तीची वीज वसुली होत असल्याची तक्रार करण्यात आली तसेच वीज बिलांचे हप्ते पाडण्याच्या सूचना नागरीकांनी केल्या. आमदारांनी वीज कंपनीने दखल घ्यावी, अशी सूचना केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, फिरोजखान पठाण, शे.अल्लाबक्ष, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, माजी नगरसेवक शाम पाटील, धनंजय चौधरी, शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहेते, सचिव शरद भारंबे, मिलिंद पाटील, नीलेश खाचणे, अभिजीत मिटकर, मनीष भंगाळे, गौरव भैरव आदी उपस्थित होते. प्रशासनाकडून नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, बांधकाम अभियंता धनराज राणे, अविनाश गवळे, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, अविनाश पाटील, आरोग्य अधिकारी महेश चौधरी, पोलीस प्रशासनातर्फे सहा.निरीक्षक देविदास इंगोले, महसूल मंडळ अधिकारी संदीप जैसवाल, तलाठी शरद पाटील, महावितरण तर्फे अभियंता सुहास चौधरी, हेमंत खांडेकर आदी उपस्थित होते.