आडगावातील बाबा महाहंस महाराजांची कोठडीत रवानगी

यावल : खोटे दस्तावेज बनवून फसवणूक केल्या प्रकरणी अटकेतील आडगाव येथील बाबा महाहंस यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी पोलिसांनी महाराज यांना न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेत अटक केली होती.

संशयीताला पाच दिवसांची पोलिस कोठडी
श्री क्षेत्र आई मनुदेवी मंदिराची जागेची आडगाव ग्रामपंचायतीच्या नमुना 8 मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंद करणे व नंतर त्या उतार्‍यावर चॅरिटेबल ट्रस्ट उघडून फसवणूक केल्याप्रकरणी सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी आडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मार्तंड पाटील उर्फ बाबा महाहंसजी महाराज यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. महाराजांना शुक्रवारी न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात महाराजांना यावल येथील प्रथमवर्ग न्या.एम.एस. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता 8 डिसेंबरपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात अजुन कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.