आझाद मैदानात विविध संघटनांची आंदोलने

0

सरकारविरोधी दिला जातोय हुंकार

मुंबई : आझाद मैदान म्हणजे आंदोलकांच्या हक्काचे ठिकाण आहे. सध्या हिवाळी अधिवेशन अंतीम टप्प्यात आले आहे. यामुळे आपल्या विविध मागण्या घेऊन अनेक संघटना आझाद मैदानावर धडकल्या आहेत. एकूण 46 छोटी-मोठी आंदोलने आज आझाद मैदानावर सुरू आहेत. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानात ठाण मांडून आहे. जर आरक्षण मान्य झाले नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी लहान मुलं, महिला, वृद्ध कोकणातून मोठ्या संख्येने आले आहेत. प्रकल्प रद्द झाला नाही, तर आजची रात्र पण आम्ही मैदानात काढू, आमच्या बायका मुलांचे काही बरेवाईट झाले, तर प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्रीही पोलीस आणि कोकणवासी यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ, संगणक परिचालक, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, तांत्रिक ऐप्रेटीस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने मागण्या मान्य होण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे. कोतवालांचे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन, निर्माण मजदूर संघटना, गोंदिया वरून महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी आले आहेत. महाराष्ट्र राज्य वाल्मीकी, रुखी, मेहतर, समाज हक्क समिती मातंग समाजावर सातत्याने होणार्‍या अन्याय अत्याचार विरुद्ध मातंग क्रांती महामोर्चाही मैदानात उतरला आहे.

Copy