‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक मागे घेण्याचे भाजपचे आदेश !

0

लेखक जयभगवान गोयल पुस्तक मागे न घेण्यावर ठाम

नवी दिल्ली: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात भाजपचेच पदाधिकारी जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले. यावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही असे म्हणत अनेक नेत्यांनी भाजपला लक्ष केले आहे. दरम्यान आता भाजपने पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहे. जयभगवान गोयल लिखीत पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिल्याची माहिती भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिली. मात्र लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. पुस्तकात काहीही वादग्रस्त नसून पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच नाही असे लेखकाने म्हटले आहे.

पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी त्यांची बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचे मला वाटते. त्यामुळेच पुस्तकाला ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेले आहे. मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी दर्शवली.

Copy