आज आणि उद्या राज्यात पावसाचा अंदाज

0

मुंबई – रविवार आणि सोमवारी राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह तुरळक पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हे वातावरण कायम राहू शकते.

ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारतात तसे दक्षिण द्विपकल्पामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, ढगांचा गडगडाट होऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे रविवार आणि सोमवारी दोन्ही दिवस जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे मंगळवारपर्यंत अशी स्थिती कायम राहू शकते. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली येथे रविवारी जोरदार वार्‍यांसह पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्येही रविवारी आणि सोमवारी पावसाचा अंदाज आहे. रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी गडगडाटासह वीजांचा लखलखाटही होऊ शकतो तर सोमवारी पावसाची शक्यता आहे.

Copy