आजी-माजी आमदारांना एस.टी च्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास-परिवहन मंत्री

0

मुंबई : महाराष्ट्राच्या आजी/माजी विधिमंडळ (विधान सभा/परिषद आमदार) सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एस.टी. महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत असल्याची घोषणा मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सवलतीचे निर्देश असलेले परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे, सन्माननीय व्यक्ती विधान परिषद अथवा विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एस.टी. च्या कोणत्याही प्रकारच्या (अश्वमेध, शिवनेरी,शिवशाही, हिरकणी, व परिवर्तन) बसमधून महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सदर प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्याकडे विधानमंडळ सचिवालयाने पुरविलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आजी/माजी विधिमंडळ सदस्यांनी सर्व सामान्यांचे हक्काचे दळणवळणाचे साधन असलेल्या एस.टी मधून प्रवास केल्यास, त्यातून सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल. यातून असुरक्षित, अवैध व खाजगी वाहतुकीऐवजी सुरक्षित व वक्तशीर धावणाऱ्या एस.टी.चा पर्याय जास्तीत जास्त लोकांना स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल.