आजपासून नवरात्रीचा जल्लोष 

0
उत्सवासाठीच्या विविध साहित्यांनी बाजारपेठ गजबजली
नवदुर्गांची मंदिरे सजली, नऊ रात्री रंगणार गरबा, दांडियाने
पिंपरी-चिंचवड : बहुप्रतिक्षित नवरात्रोत्सवास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. उत्सवासाठी लागणार्‍या विविध साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. उत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी मंडईत महिलांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, नवदुर्गाच्या मंदिरांवर संबधीत उत्सव कार्यकारिणीतर्फे विद्युत रोषणाई केली केली असून सारा परिसर उजळून गेला आहे. दरम्यान, गरबा व दांडिया खेळासाठी तरुणाई आसुसली असून आता सलग नऊ रात्री उशिरापर्यंत हा खेळ रंगेल.
शक्तीचे प्रतिक म्हणजे उत्सव
शक्तीचे प्रतीक असणारा नवरात्र उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना करण्यात येते. काही जण मातीच्या घटाबरोबरच देवीच्या प्रतिकात्मक मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करतात. बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्यास महिलांचे प्राधान्य आहे.
घट, काळी माती, शृंगार पाकिट…
देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे. देवीसाठी लागणारा लाल घट 50 रुपयाला आहे, तर काळा घट 30 रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी लागणारी परडी 30 रुपयाला आहे . पूजेसाठी लागणारे लाल कापड 50 रुपयाला आहे. तसेच हळद, कुंकू , कापूर, अगरबत्ती, गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे. मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी अखंड वात आहे. यामध्ये लांबवात, वस्त्रमाळ, फुलवात ही उपलब्ध आहे. या वाती 10रुपयाला आहेत. नारळ 15 ते 20 रुपयाला आहे. मोठी परडी 100 ते150 रुपयाला आहे, तर मंडपी 30 रुपयाला आहे. देवीचे शृंगार पाकीट 30 ते 70 रुपये, तसेच देवीच्या पूजेसाठी लागणारी लोभाणदाणी, ऊददाणीही बाजारात आल्या आहेत. एक घट बसविण्यासाठी घटासाठी लागणारी काळी माती 10 रुपयाला आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
Copy