आचारसंहितेचे पालन करा

0

भुसावळ । आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी उमेदवारांनी घ्यावी तसेच 16 फेब्रुवारी रोजी होणार्‍या निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरतांना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले. येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात मंगळवार 24 रोजी दुपारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल, सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा तहसिलदार मिनाक्षी राठोड, गटविकास अधिकारी सुभाष मावळे उपस्थित होते.

कागदपत्रांची पुर्तता करण्याची आवश्यकता
याप्रसंगी चिंचकर म्हणाले की, सर्व उमेदवारांनी सहकार्याची भूमिका घ्यावी तसेच नामनिर्देशन अर्ज भरतांना प्रतिज्ञापत्र कोरे ठेवू नये. तसेच शौचालयाचा वापर करतांना ग्रामसभेचा ठराव, जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी पत्र, मालमत्तेची माहिती, व मतदार यादीमध्ये असलेला अनुक्रमांक तसेच एक सुचक व त्याचा अनुक्रमांक त्याच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात असला पाहिजे. शासनाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर 30 दिवसांचे आत खर्च द्यावा लागेल. न दिल्यास फौजदारी खटला दाखल होवू शकतो. त्यातच अधिकृत पक्ष उमेदवारांनी एबी अर्जाची मूळ प्रत देणे गरजेचे आहे.

खर्च मर्यादा तीन लाखांपर्यंत
उमेदवाराने नवीन शेड्युल्ड बँकमध्ये खाते उघडावे. नामनिर्देशन पत्र भरल्यापासून खर्चाची सुरुवात होईल. याबाबत ज्वॉईंट खाते ग्राह्य धरले जाणार नाही. जिल्हा परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र फी सर्वसाधारण जागेसाठी एक हजार रुपये, राखीव जागेसाठी पाचशे रुपये राहील. पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी सातशे रुपये तर राखीव जागेसाठी तीनशे पन्नास रुपये राहील. पंचायत समितीसाठी दोन लाख रुपये खर्च मर्यादा असून जिल्हा परिषदेसाठी एका उमेदवाराला तीन लाखापर्यंत मर्यादा आहे. अपत्य संदर्भात सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेल्या अपत्याबद्दल अ‍ॅफिडेव्हिट करुन द्यावे, अशी माहिती निवडणूक अधिकारी चिंचकर यांनी दिली.

पक्षांच्या होताहेत बैठका
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून तालुक्यातील विविध पक्षाच्या राजकीय पुढार्‍यांनी पक्षाचे एबी फॉर्म मिळविण्यासाठी धावपळ सुरु केली आहे तर दुसरीकडे विविध पक्षांतर्फे गावोगावी फिरुन मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून पुढारी आपल्या भूमिका, केलेली कामे व निवडून आल्यानंतर राबविणार असल्याच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देत आहे. अद्याप एकाही पक्षातर्फे इच्छूक उमेदवारांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेली नसल्यामुळे उमेदवारांमध्ये काहीशी धाकधूक असून उमेदवारी जाहिर झाल्यानंतरच निवडणुकीत रंगत येणार आहे.

27 पासून अर्ज भरणार
सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी मिनाक्षी राठोड यांनी सांगितले की, 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतीम तारीख असून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे. तसेच 2 फेब्रुवारी रोजी 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून 5 फेब्रुवारीपर्यंत अपील करण्याची तारीख राहील. अपिलाचा निर्णय 8 फेब्रुारी रोजी राहणार आहे. 7 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची अंतीम तारीख राहील. माघारीनंतर चिन्ह वाटप 3.30 वाजेनंतर होणार आहे. आयोगाचे संकेतस्थळ 1 फेब्रुवारीला दुपारी 2.30 नंतर बंद होणार आहे. त्यानंतर कोणतीही तक्रार घेतली जाणार नाही.

अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई
नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवार व सुचक अन्य दोन असे चार जणांना दालनात परवानगी दिली जाणार असल्याचे तहसिलदार राठोड यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी सहकार्य करावे व सोशल मिडीयाच्या आधारे कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता गौप्यस्फोट करु नये. पोलीस प्रशासनाची निवडणुकीदरम्यान करडी नजर राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष राहील. सर्वांनी निवडणूक काळात सहकार्य करण्याचे आवाहन
त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सभापती राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, नारायण कोळी, संजय पाटील, अ‍ॅड. शशिकांत भास्कर, डॉ. विजय सुरवाडे, सुनिल महाजन, किरण कडसकर, भालचंद्र पाटील, यांसह तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.