आघाडीत कोणतेही खटके उडालेले नाही: संजय राऊत

0

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय नाही, सरकारमध्ये मतभेद आहे असे सातत्याने विरोधी पक्षाकडून सांगितले जात आहे. मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही, सरकारचे काम अतिशय उत्तमरीत्या सुरु असून सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे खटके उडालेले नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पारनेर येथील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने आणि दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यात आलेले नसल्याने मुख्यमंत्र्यांनी बदली रद्द केल्याच्या घटनेवरून सरकारमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र ही चर्चा केवळ चर्चा असून यात काहीही तथ्य नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास दिलेला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर शंका घेणे चुकीचे असल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे. शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतलेली असून त्याचे प्रसारण शनिवारपासून होणार आहे, तीन भागांमध्ये याचे प्रसारण होईल. या मुलाखतीत राजकारणातील अनेक उलगडे होतील असेही संजय राऊत यांनी सांगितले.