आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – शरद पवार

0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांकडून ब्रेक?

मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण खुद्द शरद पवारच पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल फारसे अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी थेट पार्थ पवारांच्या नावाला विरोध केला नसला तरी पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना केंव्हा संधी मिळणार? असा सवाल त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला.

शरद पवारांच्या या भूमिकेवर अजित पवारांनी अजून तरी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची मागच्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. मागच्या काही वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातील हा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवेल अशी चर्चा होती.

Copy