आगामी निवडणुकीत भाजपाची सत्ता आणणार

0

वरणगाव : सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे सुरू आहे. केंद्रात व राज्यात त्यानंतर भुसावळ नगरपालिकेतही भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकार्त्यांनी आपआपसातील मत भेद दुर ठेवल्यास पुन्हा भाजपाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला. शहरातील भाग्यलक्ष्मी लॉनवर भाजपा कार्यकर्ता सिंहस्थ मेळावा पार पडला. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आमदार सावकारे बोलत होते.

मेळाव्यास यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघटक प्रा. सुनिल नेवे, ज्येष्ठ कार्यकर्ता नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती मुरलीधर पाटील, सरपंच प्रशांत पाटील, नगरसेवक बबलू माळी, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, माजी उपसभापती अरूण इंगळे, नारायण कोळी उपस्थित होते.

नाराज न होता एकनिष्ठेने काम करा
आमदार सावकारे म्हणाले की, आरक्षीत जागेसाठी उमेदवारांनी उमेदवारी मागतांना खोटे व कालबाह्य प्रमाणपत्रे जोडू नये. उमेदवारीचे कागदपत्रे जात वैधता असे जोडलेले आहे. त्यांचा विचार पुढील उमेदवारीकरीता केला जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता आरक्षण निघाल्याने जिल्हा परिषद गटासाठी 6 महिला तर पंचायत समिती तळवेल गणाकरीता 4 इच्छुक उमेदवार आणि हतनूर गणासाठी 5 इच्छुक उमेदवार हजर होते. यापैकी एकाचीच उमेदवारी निश्चीत होणार आहे. इतर इच्छुकांनी नाराज न होता एकनिष्ठेने पक्ष श्रेष्ठींनी निवड केलेल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच गट व गण आरक्षीत झाल्यामुळे परंपरागत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोकळे झाले, असा समज करुन न घेता त्यांनी आरक्षीत भाजपा उमेदवारांना निवडून आणण्याकरीता प्रयत्न करावे, असा सुचना आमदार संजय सावकारे यांनी दिले.

येणारी निवडणूक ही विकासाची निर्णायक ठरणार असून केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये का नको, असा प्रश्न जनतेसमोर ठेवून सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विकासाची कामे अतिजलद होणार आहे. ज्या परिसरात नगरपालिका ज्या पक्षाच्या ताब्यात असते त्या पक्षाच्या नावाखाली इतर निवडणुका असतात. भुसावळ किंवा वरणगावमध्ये भाजपाच्या ताब्यात आहे तर असाच अभ्यास केला तर येणार्‍या निवडणूका भाजपाच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगितले.

प्रा. सुनिल नेवे म्हणाले की, येणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही विकासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागल्यास विजय नक्की आपल्या पदरी पडेल यात तिळमात्र शंका नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. सुत्रसंचालन व आभार भालचंद्र पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी परिसरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.