आगामी निवडणुकांमध्ये परिवर्तन निश्‍चित

0

खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्‍वास
आमदार डॉ. सतिश पाटील यांनी केले तीन भाषेत भाषण
एरंडोलल येथे महिला मेळावा

एरंडोल- देशातील मतदारांना खोटी आश्वासने देऊन व मतदारांची दिशाभूल करून सत्तेवर आलेले भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून, आगामी काळात होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परीवर्तन निश्‍चित होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. एरंडोल येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. शेतकरी आत्महत्या हे सरकारचे अपयश असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सतिष पाटील हे होते. त्यांनी मराठी, हिंदी व अहिराणी या तीन भाषांमध्ये मनोगत व्यक्त केले. दादासाहेब पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

विशेष सत्कार
महिला त्याग करते व ती आदर्श आहे. ती आपल्या परिवाराची काळजी घेत असतांना आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. तरी प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याची स्वतःकाळजी घेणे महत्वाचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी पतीला यकृत दान करून जीवदान देणार्‍या सरला विंचूरकर व कारगिल युद्धात सहभागी झालेले जवान रफीक अहमद हबिबोद्दिन शेख यांचा खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती सभेच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, माजी खासदार वसंतराव मोरे, डॉ.राजेंद्र देसले, तिलोत्तमा पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, प्रशांत पाटील, आर.डी.पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष शकूर मोमीन, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेविका वर्षा शिंदे, सुरेखा चौधरी, बानोबी बागवान माजी सभापती रेखा पाटील, प्राचार्य डॉ. ए. आर. पाटील युवक आघाडीचे अध्यक्ष संदीप वाघ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मंजुळा देसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिरीश महाजनांची स्टंटबाजीः सुप्रिया सुळेंची टीका
खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शैलीत टीका केली. राज्यातील रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे कळत नसल्याचे सांगितले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात सर्वात जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या म्हणजे सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हे कमरेला पिस्तुल लाऊन शाळेतील कार्यक्रमात जातात, बिबट्याला मारण्यासाठी हातात बंदूक घेवून स्टंटबाजी करतात अशी टीका त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.

सरकार असंवेदनशील
सद्यस्थितीत देशात महिलांवर होणार्‍या अत्याचारात मोठी वाढ झाली असून केंद्र व राज्य सरकार असंवेदनशील बनले असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक महिलेची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील मंत्री हेलिकॉप्टरने फिरत असल्यामुळे त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत अशी टीका केली. जिवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे, कृषी मालाला भाव नसल्यामुळे शेतक-यांसमोर आर्थीक संकट उभे राहिले आहे, बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली असल्याच्या त्या म्हणाल्या.

मतदार संघावरील अन्याया विरोधात जनआंदोलन
विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे सरकार कडून मतदारसंघावर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी आमदार डॉ.सतिश पाटील यांनी केला. मतदार संघात दुष्काळ असतांना देखील द्वेष भावनेने एरंडोल व पारोळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आलेला नाही. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मिळत असून निर्लज्जपणे शिवसेना सत्तेत आहे. स्वाभिमान असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले. जलसंपदा मंत्री धनशक्तीच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी काळात मतदार संघावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिलांनी निश्चय केल्यास निवडणुकीत सत्ताबदल निश्चित होईल असे सांगितले. सुत्रसंचलन प्रा. शोभना कोळी यांनी केले.

पत्रकार परिषेदत केले आरोप
नंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सरकार मधील प्रत्येकाला सरकारची मस्ती आली असून मुख्यमंत्री असताना त्यात अतिशय संवेदनशीलता असावी पण आपल्या मुख्यमंत्र्यांमध्ये ती दिसत नसल्याचे सांगितले व राष्ट्रवादी काँग्रेस ही सदैव शेतकर्‍यांच्या व सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नासाठी तत्पर असल्याचे सांगितले.

Copy