Private Advt

आक्षेपार्ह स्टेटसवरून शिरसोलीत दोन गटात वाद : दगडफेक ; वाहनांच्या काचा फुटल्या

जळगाव : सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गटात वाद झाला व नंतर या वादाचे पर्यावसान हाणामारीत घडले. नंतर दगडफेक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टाळला. दरम्यान, दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले असून एक तरुण जखमी झाला. शिरसोलीत शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहनाच्या फुटल्या काचा
दगडफेकीत रईस युसूफ मणियार यांच्या मालकीची (एम.एच.19 सी.वाय.2799) आयशर ट्रक व डॉ.सुफीयान शाहा यांच्या मालकीची चारचाकी (क्रमांक एम.एच.03 ए.आर.1508) च्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी (18) हा तरुण रस्त्याने मलीक नगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला.

वेळीच पोलिस पोहोचल्याने अनर्थ टळला
शिरसोली गावात वादात आधी आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस् ठेवणार्‍या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली, यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. वाद शांत झाल्यावर अफवा पसरवून काही तरुणांनी मलीकनगर व नशेमन कॉलनीत काही समाजकंटकांनी दगडफेक केली. मात्र शिरसोली गावात हनुमान जयंतीनिमित्त पोलीस बंदोबस्त असल्याने एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

दंगलीचा गुन्हा दाखल
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व त्यांचे सहकार्‍यांनी धाव घेतल्याने परीस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.